व्यक्तिमत्त्व विकास, ‘करिअर गाईडला’ मागणी
By Admin | Updated: January 5, 2015 23:17 IST2015-01-05T23:16:51+5:302015-01-05T23:17:52+5:30
तुलनेत वाचकांच्या संख्येत घट : नरेंद्र दाभोलकरांच्या ग्रंथांकडे तरुणांबरोबरच शाळांचीही मागणी

व्यक्तिमत्त्व विकास, ‘करिअर गाईडला’ मागणी
सातारा : मोबाईल, दूरचित्रवाहिनींच्या मोहात तरुणाई अडकत चालली असून, वाचनाकडे तिची दुर्लक्ष होत आहे, असा सूर यंदाच्या ग्रंथमहोत्सवाने खोटा ठरविला आहे. या ठिकाणी भरलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर रात्री उशिरापर्यंत वाचकप्रेमींची गर्दी होत आहे. यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, करिअरला दिशा देणारी पुस्तके खरेदीला पसंती दिली जात आहे.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर जागतिक मराठी अकादमी व सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरातील नामवंत प्रकाशकांनी पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत. यामध्ये सुमारे सत्तर स्टॉल लागले आहेत. या सर्वच स्टॉलवर गर्दी होत आहे.
आजच्या तरुणाईला खूप मोठे होण्याच्या ध्येयाने झपाटले असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे जवळ-जवळ सर्वच स्टॉलवर करिअर मार्गदर्शनावर आधारित पुस्तकांना मागणी वाढत आहे. त्यातूनही मराठी अनुवादित पुस्तकांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. त्या पाठोपाठ ‘करिअर’ला दिशादर्शक ठरणाऱ्या पुस्तकांच्या शोधात असंख्य वाचक असल्याचे जाणवत आहे.
‘करिअर कसे निवडायचं?’, ‘आर्मी जनरलच व्हायचंय!’, ‘आयटीतच जायचंय’, ‘थिंक डिफरंटली, बी सक्सेसफुल’, ‘डॉक्टरच व्हायचंय!’, ‘इंजिनिअरच व्हायचंय!’ या पुस्तकांना मागणी वाढत आहे. रश्मी बन्सल लिखित ‘टेक मी होम’ या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी अनुवादित पुस्तके संपली आहेत. पारंपरिक पुस्तकांनी आपले स्थान कायमच राखले आहे. यामध्ये थोर पुरुषांची आत्मचरित्र, शूरांच्या कथा, देशभक्तीपर पुस्तके खरेदी केली जात आहेत.
सातारा शहरासह परिसरातील शाळांनी आज (सोमवारी) विद्यार्थ्यांना ग्रंथ महोत्सवात आणले होते. त्या ठिकाणी आल्यानंतर एका रांगेत मुलांना पुस्तकांच्या स्टॉलवरून फिरवून आणले.
नुकतीच प्रिंटिंग झालेल्या अन् आजवर अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात वाचलेल्या देशभक्तांची ओळख करून देणाऱ्या पुस्तक खरेदीला प्राधान्य दिले जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांना मोठी मागणी असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निम्म्या किमतीत पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे इतर प्रकाशकही तेथूनच खरेदी करून ग्रंथाची विक्री करत आहेत.
या पुस्तकांच्या स्टॉलवर रात्री उशिरापर्यंत वाचकप्रेमींची गर्दी होते. व्यक्तिमत्त्व विकास, करिअरला दिशा देणारी पुस्तके खरेदीला पसंती दिली जात होती. (प्रतिनिधी)
शाळा-महाविद्यालयांच्या ग्रंथालयांसाठीही खरेदी
सातारा जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमधील प्राचार्य किंवा ग्रंथपालांनी सोमवारी मोठ्या प्रमाणावर ग्रंथ महोत्सवास भेट दिली. या मंडळींनी पुस्तकांच्या स्टॉलवर भेट देऊन मुलांना वाचायला आवडतील, असे पुस्तके खरेदी केली जात होती. अनेक प्रकाशकांनी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील ग्रंथालयांसाठी पुस्तके घेणार असल्याने मोठ्या प्रमाणावर सवलत दिली.