बचत गटाच्या नावावर व्यक्तिगत कर्ज

By Admin | Updated: November 15, 2015 23:51 IST2015-11-15T22:10:57+5:302015-11-15T23:51:35+5:30

आगाशिवनगरमधील अपहार : अध्यक्षासह पती, दिराने लाटले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल

Personal loan in the name of savings group | बचत गटाच्या नावावर व्यक्तिगत कर्ज

बचत गटाच्या नावावर व्यक्तिगत कर्ज

कऱ्हाड : बँक व पतसंस्थेमध्ये महिलांच्या नावे कर्ज काढून बचत गटात अपहार केल्याप्रकरणी गटाच्या महिला अध्यक्षासह तिच्या पती व दिरावर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत सुमन धनाजी वारे (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, आगाशिवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सुमन यांच्यासह अन्य काही महिलांच्या नावेही अध्यक्षांनी कर्ज काढल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
याप्रकरणी कृष्णा बचत गटाची अध्यक्षा वंदना विनायक लोहार, तिचा पती विनायक लोहार व दीर सागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन वारे या आगाशिवनगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीत वास्तव्यास आहेत. त्या एका भांड्याच्या दुकानात कामास जातात. कामातून मिळालेल्या पैशातूनच त्या त्यांच्या कॉलनीतील कृष्णा बचत गटात दरमहा दोनशे रुपये भरीत होत्या. सुमन यांच्यासह अन्यही काही महिला संबंधित गटाच्या सदस्या आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी सुमन यांनी घरगुती कारणास्तव बचत गटातून वीस हजार रुपये कर्ज काढले. त्या कर्जाचे हप्ते त्यांनी दर महिन्याला गटाच्या अध्यक्षा वंदना लोहार यांच्याकडे दिले. वंदना हिनेही ते हप्ते भरून सुमन यांच्या कर्जाची परतफेड केली. त्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी सुमन यांचे पती आजारी असल्याने त्यांनी पुन्हा १ आॅगस्ट २०१३ रोजी बचत गटामार्फत उज्वर्ण फायनान्स कंपनीकडून ३० हजार रुपये कर्ज काढले. त्या कर्जातील वीस हजार रुपये वंदना लोहार हिने सुमन यांना दिले. उर्वरित दहा हजार रुपये तिने स्वत:जवळ ठेवले. ‘आमच्या ट्रकचा अपघात झाला आहे, त्यासाठी पैशांची गरज आहे,’ असे त्यावेळी वंदना व तिच्या दिराने सुमन यांना सांगितले. त्यामुळे त्यांनीही ते पैसे त्यांना दिले. त्यानंतर सुमारे एक महिन्यांनी वंदना व तिचा दीर सागर हे दोघेजण सुमन यांच्याकडे आले. पैशाची गरज असल्याचे सांगून त्यांनी सुमन यांच्या नावे ज्योतिर्लिंग फायनान्स कंपनीतून २० हजार रुपये कर्ज काढले.
बचत गटाच्या माध्यमातून काढलेल्या ३० हजार रुपये कर्जाचे हप्ते वेळोवेळी सुमन यांनी वंदनाकडे दिले होते. ते पैसे फायनान्स कंपनीत भरावयाचे होते. मात्र, वंदनाने ते पैसे कंपनीत भरले नाहीत. अखेर फायनान्स कंपनीने सुमन यांच्याशी संपर्क साधून कर्जाचा एकही हप्ता जमा झाला नसल्याचे सांगितले. तसेच त्वरित कर्जाची परतफेड करण्याची ताकीद दिली. याबाबत सुमन यांनी वंदना यांना जाब विचारला. मात्र, वंदना, तिचा पती विनायक व दीर सागर यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ‘आम्ही बँकेचे हप्ते भरतो, तुम्ही काळजी करू नका,’ असे सांगितले. सुमन यांना संशय आल्याने त्यांनी या सर्व प्रकाराबाबत बचत गटातील इतर महिलांशी चर्चा केली. त्यावेळी अन्यही काही महिलांचे पैसे वंदना व तिच्या पती तसेच दिराने परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर काही दिवसांतच वंदना, तिचा पती व दीर कऱ्हाड सोडून सांगलीला राहण्यास गेले. त्यामुळे सुमन यांच्यासह इतर महिलांचा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. संपर्क झाला त्यावेळीही वंदना व तिच्या पतीने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुमन यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)


अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता
वंदना लोहार हिने सुमन यांच्यासह त्यांच्या आईची व इतर महिलांची फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे. सुमन यांच्या नावे वंदना तिचा पती व दिराने ३० हजारांचे कर्ज काढले. तसेच सुमन यांची आई बेबीताई सोनवणे यांच्या नावेही या तिघांनी बँक व पतसंस्थेतून ५५ हजारांचे कर्ज काढले. ही रक्कम त्यांनी बेबीताई यांना न देता स्वत: वापरली. या दोघींसह अन्यही काही महिलांबाबत त्यांनी हाच प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानुसार तपास करण्यात येत आहे.

Web Title: Personal loan in the name of savings group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.