प्रदूषणमुक्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा
By Admin | Updated: February 12, 2015 00:34 IST2015-02-11T21:32:59+5:302015-02-12T00:34:51+5:30
राजेंद्रसिंह राणा : नदी किनारी असणारी अतिक्रमणे हटविणे गरजेचे

प्रदूषणमुक्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा
वाई : ‘संत वाहते कृष्णामाई’अशी ओळख असणाऱ्या कृष्णा नदीची अवस्था ओंगळ स्वरूपाची झाली असून, तिला प्रदूषणमुक्त करावयाचे असल्यास शासनाबरोबर व्यापक लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी धोममधील नरसिंह ते भद्रेंश्वर मंदिरपर्यंत कृष्णा नदीच्या पाहणीदरम्यान केले़ यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ अश्विन मुदगल, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, मुख्याधिकारी आशा राऊत, इनटॅकचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव समूह संस्थेचे मकरंद शेंडे, वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड, रोटरीच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, डॉ. शरद अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा नदीच्या पाहणी दरम्यान पुरातन मंदिर व त्या परिसरातील घाट यांची पाहणी करून हा ऐतिहासिक ठेवा पाहून समाधान व्यक्त केले़ परंतु सध्या मंदिराच्या डागडुजीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे होत असलेले दुर्लक्ष पाहून चिंता व्यक्त केली.
नदीची पाहणी करून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याबाबत अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे वाईपर्यंत संपूर्ण पात्रात प्रत्येक गावात सोडण्यात येत असलेले सांडपाणी व नदीच्या किनारी अतिक्रमणे हटविण्याविषयी शासनाने पुढाकार घ्यावा, असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आदींनी कृष्णा नदी शुद्धीकरणाविषयी आपले मत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)