लोक भुकेपोटी दरोडा टाकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:38 IST2021-04-11T04:38:50+5:302021-04-11T04:38:50+5:30

सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा ...

People will rob when they are hungry! | लोक भुकेपोटी दरोडा टाकतील!

लोक भुकेपोटी दरोडा टाकतील!

सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

शनिवारपासून सक्तीचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीख मांगो आंदोलन केले. जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ज्ञ सांगतो, त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडाऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.

खासदार, आमदार यांच्याकडे जास्त पैसा आहे. लोकांनी त्यांच्या घरांवर दरोडे टाकावेत, असा अनाहूत सल्लादेखील उदयनराजेंनी दिला. लोक संतप्त आहेत, आता भुकेने व्याकूळदेखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवरदेखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असेदेखील त्यांनी ठणकावले.

सातारकरांच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालेला आहे. तसेच सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सामान्य सातारकर करत आहेत.

राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं

कोरोनाचे कारण पुढे करून शासन वारंवार गोरगरिबांच्या पोटावर पाय आणत आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते, असे लोक मरण पावतात. मात्र, भीक-भुकेपोटी मरणाचे प्रमाणदेखील वाढणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे. कुठलेही कारण झाले की, लॉकडाऊन काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? राजेशाही असती तर या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, असा इशारादेखील उदयनराजे यांनी दिला.

Web Title: People will rob when they are hungry!