लोकांना संविधान समजून सांगणे गरजेचे : शामसुंदर महाराज सोन्नर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:32+5:302021-07-22T04:24:32+5:30

सातारा : ‘संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या ...

People need to understand the constitution: Shamsunder Maharaj Sonnar | लोकांना संविधान समजून सांगणे गरजेचे : शामसुंदर महाराज सोन्नर

लोकांना संविधान समजून सांगणे गरजेचे : शामसुंदर महाराज सोन्नर

सातारा : ‘संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या परंपरावादी लोकांना पुन्हा तीच विषमतेची समाज व्यवस्था आणायची आहे, त्यांनीसुद्धा संविधानाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे,’ असे मत ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘विवेकाची वारी’ या तीनदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा मंगळवारी तिसरा आणि समारोपाचा दिवस होता. यावेळी ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘संतविचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, ‘माणूस म्हणून जगण्याच्या सामान्य माणसाच्या इच्छेचा आदर करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. याच विचारांचा जागर गेली सातशे वर्षे संत साहित्याने केला आहे आणि त्याचाच जागर आज आपण करत आहोत. वारकरी संप्रदाय नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावर भर देणारा आहे. वारकरी संप्रदाय अशी शिकवण देतो की, आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंत तुम्हाला मदत करतात. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’, या संत सावतामाळी यांच्या ओळींवरून कर्तव्याला संतांनी दिलेले महत्त्व दिसून येईल.’

‘लिंग समानता ही जरी संविधानाने मान्य झाली असली तरी हे मूल्य आपल्या संत वाङमयामध्ये सातशे वर्षांपासून आहे, हे सिद्ध झाले होते. आपल्या वारकरी संप्रदायातील स्त्रिया या लेचापेच्या नाहीत, बहादूर आहेत. पुरुष शेतकरी आत्महत्या करत असताना एकाही महिलेने आत्महत्या केली नाही. संत नामदेव पंजाबमध्ये असताना महाराष्ट्रात संत जनाबाई यांनी वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले. याचप्रमाणे संत सोयराबाईला स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार वारकरी परंपरेने दिला. बंधुत्वाची भूमिका आपल्याला वारीमध्ये दिसते’, असेही सोन्नर म्हणाले.

सामाजिक न्यायाची भूमिका संतांच्या विचारांत आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाळून स्त्रियांचा सन्मान करावा. आपल्या ५१ (अ) या संविधानातील कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावे.

अशोक वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. बापू शेवकरी यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचे गायन केले. राहुल माने यांनी प्रास्ताविक केले. मोहन भोईर यांनी परिचय करून दिला. मुंजाजी कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: People need to understand the constitution: Shamsunder Maharaj Sonnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.