जनता मागते एक पूल... नेते देतात दोन पूल!
By Admin | Updated: August 27, 2014 23:31 IST2014-08-27T21:23:20+5:302014-08-27T23:31:40+5:30
संगमनगर धक्का : उपमुख्यमंत्र्यांनंतर आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

जनता मागते एक पूल... नेते देतात दोन पूल!
पाटण : पाटण तालुक्यातील बहुचर्चेतील संगमनगर धक्का पुलाचा नवीन पूल आमच्यामुळेच मंजूर झाला, हा श्रेयवाद निर्माण झाला आहे. उपमुख्यंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात जुन्या पुलाच्या जागी नवीन पुलाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर मंगळवार, दि. २६ रोजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर मणेरी गौंड येथे दुसऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.
‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ ही म्हण शाळेत सर्वचजण शिकलो आहोत. पाटण तालुक्यातील कोयना नदीवरील संगमनगर धक्का पुलाकडील ३५ गावांतील ग्रामस्थांना काहीसा असाच अनुभव येत आहे. पाटणकर गट व मुख्यमंत्री गट यांच्यातील लढाई ३५ गावांना चांगलाच माहीत आहे. मात्र, यातून येतील लोकांचा चांगलाच फायदा होणार आहे.
कोयना धरणातून पावसाळ्यात पाणी सोडल्यानंतर संगमनगर धक्का पूल हमखास पाण्याखाली जातो. त्यामुळे पुलापलीकडील ३५ गावे संपर्कहीन होतात. ३५ गावांची वाताहत अनेक वर्षांपासून सुरू आहे. पाटणकर २५ वर्षे, तर शंभूराज देसाई पाच वर्षे आमदार होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील हे तत्कालीन खासदार होते. ही सर्व मंडळी पाटण तालुक्यातील, त्यांनी संगमनगर धक्का पुलासाठी प्रयत्नही केले. मात्र, ते आजअखेर अर्ध्यावरच राहिले.
संगमनगरचा नवीन पूल बांधणे हे तसे मोठे आव्हानच वाटू लागले होते. कालांतराने संगमनगर पूल ही ऐवढी किरकोळ बनली. त्यास दोन्ही काँग्रेसमधील श्रेयवादच कारणीभूत ठरला आहे. श्रेयवादात दोन्ही बाजूंकडून चक्क नेत्यांनीच उडी घेतल्याने हे शक्य झाले. बघता-बघता एक नव्हे दोन पूल होणार हे निश्चित झाले. आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी नेहमीच्या रणनीतीप्रमाणे अजित पवार यांना आणून भूमिपूजन उरकले. केवळ उद्घाटन करून चालणार नाही. हा पुल अस्तित्वात येण्यास आणखी किती दिवस वाट पाहावे लागणार आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)