परिस्थितीला दोष न देता गाठले यशाचे शिखर
By Admin | Updated: June 27, 2016 00:38 IST2016-06-26T22:59:51+5:302016-06-27T00:38:37+5:30
जिद्दीला सलाम : हृषीकेश बोधे याने बँकेत मिळविली नोकरी
परिस्थितीला दोष न देता गाठले यशाचे शिखर
दत्ता यादव --सातारा धडधाकट व्यक्ती प्रयत्न न करता आपल्या परिस्थितीला दोष देत बसतो. आपल्या आजूबाजूला असे अनेकजण दिसतात; परंतु कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढून स्वत:चे करिअर स्वत: घडविणारे समाजात विरळच भेटतात.
साताऱ्यातील शनिवार पेठेतील हृषीकेश बोधे या अंध युवक याला अपवाद ठरला. त्याने समाजासमोर एक आर्दश निर्माण करून ठेवला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी अपघाताने दृष्टी गेली; मात्र रडत-खडत न बसता त्याने नॉर्मल मुलांसारखे शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या हिमतीवर बँकेत नोकरीही मिळविली.हृषीकेश बोधे अवघा २६ वर्षांचा युवक. तो दहा वर्षांचा असताना त्याला ताप आला. साताऱ्यातील एका डॉक्टरांकडे त्याला नेण्यात आले; मात्र आजार बरा होण्याऐवजी तो वाढतच गेला. औषधांच्या गोळ्यांचे रिअॅक्शन होऊ लागले. हळूहळू त्याला दिसेनासे झाले. काही दिवसांनंतर तर त्याला समोरचे काहीस दिसू लागले नाही. लहापणापासूनच चुणचुणीत आणि हुशार असलेल्या हृषीकेशची दृष्टी गेल्याने त्यांच्या घरातल्यांना जबर मानसिक धक्का बसला.
हृषीकेशचे प्राथमिक शिक्षण नवीन मराठी शाळा तर महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात झाले. तो अंध असला तरी त्याने इतर नॉर्मल मुलांबरोबरच शिक्षण पूर्ण केले. राज्यशास्त्रमधून त्याने ‘एमएम’ पदवी घेतली आहे. मास कम्युनिकेशन जर्नालिझम, एमसीव्हीसी आदी कोर्सही त्याने पूर्ण केले आहेत. बारावीला असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता.
चार वर्षांपूर्वी त्याने एका राष्ट्रीयकृत बँकेची परीक्षा दिली. ही परीक्षा तो चांगल्या गुणाने पास झाला. सुरुवातीला त्याला पुण्यामध्ये नोकरी मिळाली.
वर्षापूर्वी त्याने साताऱ्यात बदली करून घेतली. कोणाचाही आधार न घेता तो एकटा रोज बँकेत जातो. बँकेत तो लिपिक म्हणून कार्यरत आहे. कॅशशी रिलेटेड तो काम करत नाही; मात्र बँकेत येणाऱ्या ग्राहकाला तो स्टेटमेंट काढून देणे, कर्जविषयी माहिती देणे, पासबुक भरून देणे यासह इतर कामे तो करतो. हेडफोनद्वारे त्याला कोण व्यक्ती आहे. खाते नंबर किती आहे, याची सर्व माहिती मिळते. त्यामुळे कसलीच अडचण भासत नाही.
हृषीकेशला हवी डोळस पत्नी !
भावी जोडीदाराबाबत हृषीकेश भरभरून बोलला. मी शंभर टक्के अंध आहे; मात्र मला डोळस पत्नी हवी आहे. दोघेही अंध असतील तर अनेक समस्या उद्भवतील. दोघांनाही एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे मला जग नाही पाहता आलं; मात्र माझ्या पत्नीला तरी हे जग पाहता यावं, यासाठी मला डोळस पत्नी हवी आहे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
मित्रांमुळेच मी सामाजात वावरतो !
पहिल्यापासूनच मला माझ्या मित्रांनी प्रचंड सपोर्ट केला. माझ्या मित्रांमुळेच केवळ मी समाजात वावरतो. मी अंध असल्याचे मला माझे मित्र जाणवू देत नाहीत. ट्रेकिंगला असेल किंवा पिकनिकला. मला सोबत घेतल्याशिवाय माझे मित्र जात नाहीत. त्यांच्या सहाकार्यामुळेच समाजात मानाने उभा आहे.