वाल्मिक पठारावर मोरांची शिकार

By Admin | Updated: December 5, 2014 23:35 IST2014-12-05T20:58:16+5:302014-12-05T23:35:17+5:30

वनविभाग बंधारे बांधण्यात व्यस्त : मोरांचा बळी घेऊन पिसे काढून घेतल्याचा प्रकार उघड

Peacocks hunting on the Valmik Plateau | वाल्मिक पठारावर मोरांची शिकार

वाल्मिक पठारावर मोरांची शिकार

रवी माने - ढेबेवाडी -विभागात वनविभाग कार्यक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना ताज्या असतानाच आता मोरांची शिकार होऊ लागल्याने विभागातील मोरांची संख्या कमालीची घटल्याची चिन्हे दिसू लागली आहेत़ शिकाऱ्यांकडून वन्य पशु-पक्षांना लक्ष्य केले जात असताना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी ‘सिमेंट बंधारे’ बांधण्यात व्यस्त असल्याने वन्य पशु-पक्षांचे रक्षण कराणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे़
विभागातील वाल्मिक पठारावर दुर्मिळ वन्य प्राणी तसेच पक्षांची मोठी संख्या आहे़ काही दिवसांपासून या पठारासह संपूर्ण कार्यक्षेत्रात शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने प्राणी-पक्षांचा वावर मानवी वस्तीच्या दिशेने होऊ लागला आहे़ यापूर्वी करपेवाडी- डुबलवाडी गावांच्यानजीक असलेल्या वनक्षेत्रासह खासगी शिवारातही बिबट्यांची शिकार करण्यात आली होती़ त्या घटनांचा अद्याप तपास अपूर्ण असतानाच आता पुन्हा एकदा शिकाऱ्यांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे़
मान्याचीवाडी गावानजीक असलेल्या वनविभागाच्या हद्दीत मोराची शिकार झाल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले़ शिकार करण्यात आलेल्या मोरांची संपूर्ण पिसे काढण्यात आली असून, त्यांचे अवशेष त्याच ठिकाणी टाकण्यात आले आहेत़ यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडूनसुध्दा वनविभाग गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे़
दरम्यान, विभागातील खासगी क्षेत्रासह वनकार्यक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीसह वृक्षतोडीच्या घटनांनी जोर धरला असताना येथील कर्मचारी-अधिकारी अर्थकारणातून या घटनांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट होत आहे़ येथील लाकूड व्यापारी आणि मिलचालकांच्या ‘साटे-लोट्यातून’ वनसंपत्तीचाही ऱ्हास चालू असून याठिकाणी कारवाईची कोणतीच घटना वनदप्तरी दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
वन विभागाच्या प्रादेशिक आणि वन्यजीव या दोन विभागांच्या हद्दीच्या तिढ्यामुळेही वन्यजीव आणि झाडे असुरक्षित होत आहेत.


काही दिवसांपासून विभागात मोरांची संख्या कमालीची घटली आहे़ आमच्या शेतामध्येही मोरांचे वास्तव्य होते़ मोर शेतातील सापांना खात असल्यामुळे परिसरातील सापांचा वावर कमी झाला होता़ शेतात काम करताना सापांची भीती वाटत नव्हती़ मात्र, आता मोरांची संख्याच घटल्याने शेतात कम करताना आता सापांची भीती वाटू लागली आहे़ परिसरातील मोरांचे जतन व्हायला हवे.
- सर्जेराव माने, शेतकरी

 

Web Title: Peacocks hunting on the Valmik Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.