मयूरचा काटा बदनामीच्या भीतीने

By Admin | Updated: June 14, 2014 01:36 IST2014-06-14T01:20:23+5:302014-06-14T01:36:31+5:30

मास्टरमाइंड गजाआड : सहा महिन्यांपूर्वीच करायचा होता खून

Peacock's fear of defamation | मयूरचा काटा बदनामीच्या भीतीने

मयूरचा काटा बदनामीच्या भीतीने

कऱ्हाड : शहरातील सोमवार पेठेत राहणाऱ्या मयूर गोरे या युवकाचा खून बदनामीच्या भीतीमुळे करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी वैभव रमेश माने (वय २५, रा. सत्यजित अपार्टमेंट कार्वेनाका, कऱ्हाड) या मुख्य सूत्रधारास कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. निकटवर्तीय महिलेशी विवाहापूर्वी असलेली मयूरची मैत्री भविष्यात बदनामीकारक ठरेल, अशी भीती वैभवला होती. त्यामुळेच त्याने मयूरचा खून करविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.
जखिणवाडी येथे काही दिवसांपूर्वी मयूर गोरे या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. हल्लेखोरांनी पिग्मीचे खाते काढायचे असल्याचे सांगून मयूरला भेटण्यासाठी जखिणवाडीत बोलवले होते.
मयूर आपला मावसभाऊ सिद्धार्थला सोबत घेऊन दुचाकीवरून जखिणवाडीत गेला असताना पाणंद रस्त्यावर हल्लेखोरांनी मयूर व सिद्धार्थवर कोयत्याने हल्ला केला. बचावासाठी सिद्धार्थ नजीकच्या उसाच्या शेतात पळाला तर मयूर रस्त्याच्या दिशेने धावला. हल्लेखोरांनी भरवस्तीत मयूरला गाठून त्याच्या डोक्यात खोऱ्याचा आघात केला. त्यानंतर पिस्तुलातून मयूरवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात मयूरचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे व खुनाची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलिसांची वेगवेगळी तीन पथके नेमली. या पथकांकडून प्रकरणाचा तपास केला जात होता. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, उपनिरीक्षक रमेश गर्जे यांच्याकडून प्रकरणाचा कसून तपास केला जात असताना या प्रकरणाचा मास्टरमाइंड वैभव माने पोलिसांच्या हाती लागला. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी वैभव माने याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील इतर संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. इतर संशयित लवकरच हाती लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Peacock's fear of defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.