सार्वजनिक शौचालयाचे रुपडे पालटले
By Admin | Updated: August 20, 2015 20:53 IST2015-08-20T20:53:45+5:302015-08-20T20:53:45+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : मंगळवार पेठेतील नागरिकांमध्ये समाधान--लोकमतचा प्रभाव

सार्वजनिक शौचालयाचे रुपडे पालटले
सातारा : येथील मंगळवार पेठेतील संत कबीर सोसायटीमधील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने या सार्वजनिक शौचालयाचे रुपडेच पालटून टाकले.येथील मुख्य रस्त्यावरच सांडपाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पेठेपासून काही अंतरावर वास्तव्यास असणारे नगराध्यक्ष सचिन सारस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या पेठेतील नागरिकांमधून होत होती. चिपळूणकर बागेजवळ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. चार पुरुषांसाठी तर चार महिलांसाठी सार्वजनिक शौचालये आहेत. महिलांची शौचालये बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. परंतु पुरुषांची शौचालये अत्यंत खराब झाली होती. शौचालयाचे दरवाजे तुटलेले आणि आतून कड्या नाहीत, अशी अवस्था होती.तसेच आतील भांडीही फुटलेली होती. येथील नागरिकांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौचालयाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती; परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मात्र, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. नगराध्यक्ष सचिन सारस आणि माजी नगरसेवक अशोक शेडगे यांनी शौचालयाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले. सार्वजनिक शौचालयाला नवीन दरवाजे बसविण्यात आले आहेत. तसेच आतील फरश्या आणि भिंतीला रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावर सांडपाणी येत होते. ते बंधिस्त करण्यात आले आहे. शौचालयाचे रुपडे पालटल्याने नागरिकांत समाधान आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ला धन्यवाद
मंगळवार पेठेतील सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिक अक्षरश: हतबल झाले होते. ‘लोकमत’ने नागरिकांची समस्या जाणून घेऊन वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे नागरिकांची कायमस्वरूपी समस्या मिटली. त्यामुळे अनेक नगरिकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.