रूग्णांचा अजूनही डोलीतून प्रवास!
By Admin | Updated: December 9, 2014 00:31 IST2014-12-08T23:55:50+5:302014-12-09T00:31:59+5:30
सातर परिसरातील वाड्यावस्त्यांची स्थिती : रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल, विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी रोजचीच पायपीट

रूग्णांचा अजूनही डोलीतून प्रवास!
सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या एका टोकाला वसलेले सातर हे हजार लोकसंख्येचे गाव़ या गावांतर्गत माहळुंगेवाडी, लखनवाडी, बौध्दवस्ती, सुतारवाडा, धनगरवाडा या वस्त्यांचा समावेश होतो. रस्त्यासाठी संघर्ष करत या वस्त्यांमधील ग्रामस्थांच्या दोन पिढ्या संपल्या आहेत़ मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही़ शासनाच्या नाकर्तेपणामुळे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी आजही येथे डोलीचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे़
पाटण तालुक्याच्या दुर्गम व डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या ढेबेवाडीपासून १५ ते १७ किलोमीटरच्या अंतरावर उंच डोंगराच्या माथ्यावर ही गावे एकमेकांपासून केवळ ५०० ते ७०० मीटर अंतरावर वसली आहेत़ या ठिकाणी रस्ताच नसल्याने गावांना मूलभूत सुविधा म्हणजे काय, हे आजही माहीत नाही. जिंती गावापासून वरच्या बाजूला डोंगरातून जाण्यासाठी रस्ता आहे़ फार पूर्वीपासून डोंगरात पाऊलवाट तयार करण्यात आली आहे़ येथील ग्रामस्थ व महिला श्रमदानाने ही पायवाट प्रत्येक वर्षी तयार करतात.मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने रस्ता मुजून जातो़ जिंतीपासूून ५ किलोमीटर अंतर दररोज पायी चालावे लागते़ त्याठिकाणी वाहने जाऊ शकत नाहीत़ रात्री-अपरात्री डोंगरदऱ्यांतून चालताना जंगली प्राण्यांच्या आवाजाने जिवाचा थरकाप उडतो.
येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिंती येथे ५ किलोमीटर अंतर रोज चालत जावे लागते़ रस्ता नसल्याने विद्यार्थी डोंगरदऱ्यातून मार्ग काढत शिक्षण घेत आहेत़ या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा नेत्यांना निवेदने देऊन आपल्या अडचणी सांगितल्या़ मात्र, राजकीय नेत्यांनी त्यांना आजपर्यंत फक्त आश्वासने देऊन झुलवत ठेवले आहे़ डोंगरदऱ्यांतून ये-जा करताना वन्य श्वापदांचा त्रास सहन करावा लागत आहे़ केवळ रस्त्याअभावीच ही वेळ ग्रामस्थांवर आली आहे़
या दुर्गम वाड्यावस्त्यांवर रस्ता केव्हा पोहोचणार आणि प्रगतीचे वारे केव्हा पोहोचणार, याची प्रतीक्षा तीन पिढ्या सुरू आहे. (वार्ताहर)