गत आठवड्यात संस्था विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी पाटण तालुक्यातील प्रशासन सरसावले. गावोगावी आरोग्य उपकेंद्र, विद्यालये व प्राथमिक शाळेत कोरोना सेंटर स्थापन करण्यासाठी युध्दपातळीवर कामे सुरू आहे. अनेक गावांत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, गावपातळीवरील नेत्यांनी सहभाग नोंदवीत दोन दिवसांत विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. यासाठी तालुक्यात १५ पथके तयार केली आहेत. या पथकामध्ये प्रांतधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध विभागांतील अधिकारी व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात गृह अलगीकरण करण्याऐवजी तीस बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह अलगीकरणापेक्षा विलगीकरण कक्ष संकल्पना चांगली आहे. यासाठी मंडलाधिकारी प्रत्येक गावामध्ये जाऊन विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने त्या कक्षामध्ये सुविधाही पुरविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या विलगीकरण कक्षांमध्ये दाखल होण्यास रुग्ण धजावत नसल्याचे चित्र आहे.
- चौकट
बहुतांश रुग्ण घरीच उपचारात
विलगीकरण कक्षासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत रूम धुणे, गावातील लोखंडी बेड गोळा करणे, वाचनालयासह करमणुकीसाठी टीव्ही संच लावणे, स्वच्छ फिल्टरचे पाणी पुरवणे आदी कामे केली आहेत. तसेच अनेकांनी कक्षासाठी मदतही केली आहे. मात्र, तरीही रुग्ण कक्षात जाण्यास तयार नाहीत.
- चौकट
वादावादीचे प्रकार
गावोगावी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण विलगीकरण कक्षात आले आहेत. बाकीचे रुग्ण घरीच आहेत. गावपातळीवरील कोणी विलगीकरणात येण्याबाबत सूचना अथवा विनंती केली तर तुम्ही जबाबदारी घेणार का, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. त्यामुळे वाद उद्भवत आहेत.