रिंगणस्थळाकडे जाणारा मार्ग प्रशस्त व्हावा -पंढरीची वाट लई अवघड :२
By Admin | Updated: June 24, 2015 00:47 IST2015-06-23T23:54:31+5:302015-06-24T00:47:23+5:30
तरडगावमध्ये सुविधांकडे दुर्लक्ष : तीन वर्षांपासून रखडलाय रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न

रिंगणस्थळाकडे जाणारा मार्ग प्रशस्त व्हावा -पंढरीची वाट लई अवघड :२
सचिन गायकवाड - तरडगाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १८ जुलै रोजी सांप्रदायिक वारसा लाभलेल्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथे येत आहे. भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तरडगावमधील माउलींच्या पालखीच्या अंतर्गत मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण रखडले आहेत. पालखी सोहळ्यापूर्वी रस्ते रुंदीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बसस्थानक परिसर व गावातील मार्ग मोकळा श्वास कधी घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
वारीतील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होते. हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. रिंगणस्थळी रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. तसेच चांदोबाचा लिंब हे मंदिर रस्त्यालगत असल्यामुळे ते दुसऱ्या जागी बांधणार की तेथेच राहणार, याबाबत भाविकांमध्ये संभ्रमवस्था आहे. पालखी गावातून खांद्यावरून नेली जाते. चार ठिकाणी अभिषेक करून गावप्रदक्षिणा होते. दिंड्याही गावातून जातात. त्यामुळे मोठी गर्दी होते. अंतर्गत मार्गाची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
रस्त्यांची दुरवस्था, तुंबलेली गटारे, रस्त्यावरून वाहणारे पाणी, अतिक्रमण, अर्धवट राहिलेले पुलाचे काम मोठी डोकेदुखी आहे. ही सर्व कामे प्रशासनाने पालखी सोहळ्यापूर्वी करावीत, अशी मागणी भाविक, नागरिकांमधून होत आहेत.
पुलाचे काम अपूर्णच
बसस्थानक परिसरात अपूर्णावस्थेतील पुलाचा डोलारा पालखी काळात डोकेदुखी ठरतो. पालखी, मोठी वाहने, दिंड्या पुलावरून जात असताना प्रशासनाला कसरत करावी लागते. पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.