पाटण बाजार समिती निवडणुकीत पाटणकरांचीच ‘जीत’!
By Admin | Updated: August 24, 2015 23:15 IST2015-08-24T23:11:06+5:302015-08-24T23:15:32+5:30
राष्ट्रवादीच्या पॅनेलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून विजय मिळविला आहे

पाटण बाजार समिती निवडणुकीत पाटणकरांचीच ‘जीत’!
पाटण : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून विजय मिळविला आहे.
पाटण बाजार समिती निवडणुकीतही विधानसभेचा करिष्मा दाखवू, या आत्मविश्वासाने रणांगणात उतरलेल्या विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या पॅनेलने सपशेल नांगी टाकली. या निवडणुकीत किमान ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा आपण पटकावून पाटणकर गटाची एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीत शिरकावकरू, अशी अपेक्षा देसाई गटाची होती. मात्र, तसे न होता सोसायटी मतदारसंघात सरासरी दोनशे मते, ग्रामपंचायत मतदारसंघात ९० मते, व्यापारी मतदारसंघात २२५ मतांच्या फरकांनी पाटणकर गटाने सर्वच्या सर्व जागांवर बाजी मारली. यापूर्वी पणन प्रक्रिया व हमाल-मापाडीमधून पाटणकर गटाचे जे. व्ही. जाधव, आनंदराव पवार हे बिनविरोध निवडून आले होते.
सोमवारी झालेल्या मतमोजणीत मतदारसंघ व विजयी उमेदवार असे : सोसायटी मतदार संघ : अरविंद जाधव, अधिक माने, राजाराम मोरे, सुहास माने, विक्रमसिंह पाटणकर, सुभाष पाटील, दादासाहेब यादव, शहाबाई यादव, रेखा पाटील, शंकर सपकाळ, श्रीरंग मोहिते. ग्रामपंचायत मतदारसंघ : अभिजित जाधव, उत्तम जाधव, आनंदा डुबल, सीताराम मोरे. व्यापारी : रामदास कदम, शरद राऊत.
पाटणकर गटात चैतन्याची लाट
पाटण बी.एड. कॉलेजवर सोमवारी दुपारी एक वाजता मतमोजणी झाली. दरम्यान, मतमोजणी केंद्राच्या गेटवर पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. निकाल जसजसे बाहेर येतील, तसतसे फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत होते. त्यातच गटाचे सत्यजित पाटणकर व विक्रमबाबा पाटणकर यांचे आगमन होताच विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मतमोजणी केंद्रापासून शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.