पाटणला युवकांची धूमस्टाईल स्टंटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:13+5:302021-01-15T04:32:13+5:30

पाटणमध्ये दिवसा आणि रात्री सुसाट वेगात दुचाकी चालवून धुमाकूळ घालणाऱ्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुसाट आणि भरधाव वेगाने ...

Patan youth smoky style stunts | पाटणला युवकांची धूमस्टाईल स्टंटबाजी

पाटणला युवकांची धूमस्टाईल स्टंटबाजी

पाटणमध्ये दिवसा आणि रात्री सुसाट वेगात दुचाकी चालवून धुमाकूळ घालणाऱ्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुसाट आणि भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या या युवकांमुळे रस्त्यावरून चालत निघालेल्या निष्पापांच्या जीवांशी खेळ होत आहे. अशा युवकांना आवरण्यासाठी पाटण पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. शहरात एक मोठे महाविद्यालय, एक आयटीआय कॉलेज, दोन कनिष्ठ महाविद्यालयेे व चार हायस्कूल आहेत. विशेषकरून महाविद्यालयाच्या परिसरात वर्ग सुरू होण्याच्या वेळी दररोज सकाळी आणि दुपारी धूमस्टाईल युवकांचा राजरोसपणे वावर सुरू आहे. मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींची या परिसरात स्पर्धाच सुरू असल्याचे अनेक वेळा दिसून येते. सुसाट दुचाकी पळविणे, हा संबंधित युवकांचा रोजचा उद्योग सुरू आहे. महाविद्यालय भरण्याच्या वेळेस रस्त्यावरून दुचाकी पळविणे, अचानक समोर ब्रेक मारून दुचाकी उभी करणे, दुचाकी एका पायावर जागेवर वळविणे, मोठमोठ्या आवाजात हॉर्न वाजविणे यासोबत लहान-मोठे स्टंटही या युवकांकडून केले जातात. त्याद्वारे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे राजरोजपणे दिसत आहे. या युवकांच्या कृत्यांना आळा घालण्याची गरज आहे. शहरातील वाहतुकीची शिस्त पूर्णपणे बिघडली असल्याचे दिसत आहे.

शहरातील रस्ते चांगले असले तरी काही ठिकाणी रस्त्यानजीक बांधकामाचे साहित्य पडलेले असते. अशा ठिकाणी दुचाकीच्या वेगावर मर्यादा असलीच पाहिजे. अन्यथा दुचाकी घसरून दुचाकीस्वारासह रस्त्यावरून चालत निघालेल्या पादचाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यावरून वृद्ध अथवा लहान मुले काही कामानिमित्त चालत निघालेली असताना सुसाट दुचाकीस्वार त्यांच्या जिवाची पर्वा न करता वेगात दुचाकी चालवितात. त्याचा वृद्धांसह लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांच्या या धूम स्टाईलमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी भरघाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या युवकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

^- चौकट

कारवाईत सातत्य नसल्याने दुचाकीस्वार सुसाट

पाटण शहरातील महाविद्यालय परिसरासह मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून कधीही कारवाई केली जात नाही. दुचाकीस्वारांचा वाहन चालविण्याचा परवाना तसेच दुचाकीची कागदपत्रे तपासली जात नाहीत. त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचे फावते. अनेक अल्पवयीन मुलेही बिनदिक्कतपणे रस्त्यावरून सुसाटपणे दुचाकी चालवितात. पोलिसांकडून अशा मुलांच्या पालकांवरहीकारवाई होणे गरजेचे आहे. कारवाईत सातत्य राहिल्यास अशा प्रकारांना आळा बसेल.

Web Title: Patan youth smoky style stunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.