‘पाटण’मध्ये अडकलंय ‘कऱ्हाड दक्षिण’चं ‘उत्तर’!
By Admin | Updated: October 12, 2014 23:35 IST2014-10-12T22:21:38+5:302014-10-12T23:35:17+5:30
सावळा गोंधळ : उंडाळकर म्हणताहेत राष्ट्रवादीचा पाठिंबा; पण प्रचारात कोणी दिसेना

‘पाटण’मध्ये अडकलंय ‘कऱ्हाड दक्षिण’चं ‘उत्तर’!
प्रमोद सुकरे -- कऱ्हाड --दक्षिणेत अपक्ष उमेदवार आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलाय म्हणे! पण प्रचार अंतिम टप्प्यात असतानाही राष्ट्रवादीचा स्थानिक अथवा वरिष्ठ नेता त्यांच्या प्रचारात दिसेना झालाय़ त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यावर ‘पाटण’मध्ये ‘कऱ्हाड दक्षिण’चं ‘उत्तर’ अडकल्याची माहिती मिळाली आहे़
पाच वर्षांपूर्वी झालेल्या पुनर्रचनेत कऱ्हाड दक्षिण, उत्तर अन पाटण विधानसभा मतदारसंघात भेळमिसळ झाली; पण प्रस्थापितांना तेथे सत्तेचा ‘मेळ’ घालताना बराच ‘खेळ’ करावा लागतोय़ तिन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते एकमेकांत गुंतल्याने विजयाचं गणित एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून असतं.
उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीने उंडाळकरांना पाठिंबा देण्याची खेळी चालवली; पण यादवांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिल्याने ती खेळी राष्ट्रवादीच्या अंगलट आली़ शिवाय उंडाळकरांचा पाटण अन कऱ्हाड उत्तरेत फायदा होताना दिसेनासा झालाय़ सध्या पाटण मतदारसंघात ढेबेवाडी, कुंभारगाव अन सुपने-तांबवे हे तीन जिल्हा परिषद गट आहेत़ तेथे उंडाळकर समर्थकांचा मोठा गट आहे़ पण दस्तुरखुद्द त्यांच्याच ताब्यातील संस्थांच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे चित्र आहे़ कऱ्हाड उत्तरमधील अनेक समर्थकांनी धैर्यशील कदमांचा ‘हात’ बळकट करण्याचा निर्णय घेतलाय म्हणे! काहीजण प्रस्थापितांची ‘शिट्टी’ वाजवायची म्हणतायत़.
उंडाळकर समर्थक या दोन मतदारसंघात वेगवेगळी भूमिका घेत असल्याची चर्चा असल्याने दक्षिणेत राष्ट्रवादीने उंडाळकरांचे काम का करावे, असा प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारताहेत. मुळात उंडाळकरांना राष्ट्रवादी अधिकृत उमेदवारी द्यायला तयार होती; पण त्यांनी ती घेतली नाही़ शेवटी त्यांनाच पाठिंबा देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली़ पण त्याचा उंडाळकरांना अन उंडाळकरांच्या कार्यकर्त्यांचा पाटण अन कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीला किती फायदा होणार, हे लक्षात येत नाही.
‘दुखावलेले’ काय करणार?
कऱ्हाड दक्षिणेत उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा मोठा गट आहे़ पण उत्तरेत पृथ्वीराज चव्हाण समर्थक धेर्यशील कदमांनी उमेदवारी केली आहे़ उंडाळकर समर्थकांनी त्याला साथ दिल्याची चर्चा आहे़ डॉ़ अतुल भोसलेंनी गेल्या निवडणुकीत उत्तरेवर स्वारी करून बाळासाहेबांना दुखावले आहे़ त्यामुळे बाळासाहेबांचा गट दक्षिणेत कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे़
वाठारकर गटाची भूमिका काय?
दक्षिणेत वाठारकर गटही महत्त्वाचा! राष्ट्रवादीने जरी उंडाळकरांना पाठिंबा दिला असला तरी, याच उंडाळकरांनी वाठारकरांचा तीनदा पराभव केला आहे़ त्याला अतुल भोसले गटाने नेहमीच साथ केली आहे़ याचा विसर वाठारकर गटाला पडलेला दिसत नाही़ स्तब्ध असणारा हा गट काय करणार हेही महत्त्वाचे!
हा कसला पाठिंबा!
सध्या तरी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांच्या पत्रकावर राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा असे छापलेले पाहायला मिळतेय; पण राष्ट्रवादीने सांगोल्याचे अपक्ष उमेदवार गणपतराव देशमुख अन अमरावतीचे अपक्ष उमेदवार रवी राणा या दोन उमेदवारांनाच राष्ट्रवादीपुरस्कृत केल्याचे तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी खासगीत सांगतात़