पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सुरुवात श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंड्याच्या भव्य मिरवणूकीने मंगळवारी झाली. ‘श्री सेवागिरी महाराज की जय...’चा जयघोष, ढोल-ताशा, लेझीम, बँडपथक, तुतारी व झांजपथक, गझी पथक यांच्या निनादात यामुळे पुसेगावमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शासकीय विद्यानिकेतन परिसर व सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा १६ ते २६ डिसेंबर या कालावधीत यात्रा होणार आहे. यात्रेस महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात व आंध्रप्रदेशसह इतर राज्यांतून चौदा ते पंधरा लाख भाविक मोठ्या संख्येने येतात. याही वर्षी भाविकांची मोठी संख्या वाढण्याची शक्यता आहे. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी साडेआठला मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त मोहन जाधव, शिवाजीराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, अॅड. विजय जाधव, सरपंच मंगल जाधव, उपसरपंच संदीप जाधव, राघवेंद्र महाराज, संतोष जाधव, रणधीर जाधव, पृथ्वीराज जाधव, दिलीप जाधव, जगनशेठ जाधव, गुलाबराव वाघ, दिलीप बाचल, अंकुश पाटील, सदाशिव जाधव, धनाजी जाधव, प्रकाश जाधव, रमेश जाधव, रघुनाथ दळवी, भरत मुळे, रमेश देवकर, मनोज जाधव, आबुशेठ मुलाणी उपस्थितीत होते. शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी चौकात विविध कलाविष्कार सादर केले. श्री सेवागिरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला स्वच्छतेचा संदेश देणारा चित्ररथ या मिरवणूकीचे आकर्षण ठरले. अन्य विद्यार्थ्यांनी इतर थोर व्यक्तींचे पोशाख परिधान करुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोचविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करुन लेझीम, कार्यक्रम लक्षवेधक ठरला. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी नियोजन केले आहे. मिरवणुकी नंतर मानाचा झेंडयाची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. (वार्ताहर) पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणूकीला मंदीरापासून सुरुवात झाली. ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे दर्शन घेतले. मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणूकीसमोर बँडपथके, श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री सेवागिरी विद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राधाकृष्णन इंग्लिण मिडीयम स्कूल, सेवागिरी इंग्लिश मिडीयम स्कूल, शासकीय विद्या निकेतन या शाळांचे विद्यार्थी ,झांज व लेझीमपथके सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे पूजन करताना सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
पुसेगाव यात्रा : ढोल-ताशाच्या गजरात झेंडा मिरवणूक उत्साहात
By admin | Updated: December 16, 2014 23:39 IST