पसरणी घाट १४ तास धुमसतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:07+5:302021-03-15T04:35:07+5:30
वाई : गेल्या चार-पाच वर्षांपासून वन विभागाने वणव्याबाबत चांगली जागृती केल्यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात जंगलाबद्दल आस्था निर्माण झाली आहे. ...

पसरणी घाट १४ तास धुमसतोय!
वाई : गेल्या चार-पाच वर्षांपासून वन विभागाने वणव्याबाबत चांगली जागृती केल्यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात जंगलाबद्दल आस्था निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण मुले वणवा रोखण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु अजूनही वणवा लावणाऱ्या लोकांमध्ये शहाणपणा येत नाही. अत्यंत निर्दयी असे हे लोक वणवा लावतच आहेत. सलग १४ तास पसरणी घाटात लावलेला वणवा वन विभागाचे कर्मचारी व शिवसह्याद्री ॲकॅडमीचे सदस्य व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी विझवित असताना त्यांना हवे तसे यश मिळाले नाही.
रात्रीच्यावेळी प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वणवा लावणारे समाजकंटक या दोघांवर भारी पडून जवळपास पाच किलोमीटर एवढे अंतर जळून खाक झाले, तर वणवा विझविताना वन विभागाचे तीन कर्मचारी, तसेच शिवसह्याद्री ॲकॅडमीचे दहा सदस्य व तीन वन कर्मचारी जखमी झाले. काहीजण अंधार असल्याने कड्यावरून खाली पडले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. किरकोळ जखमांवर मात करत डोंगराचा काही भाग वणव्यापासून वाचविण्यात यश आले. मात्र, निसर्गाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. पक्ष्यांची घरटी जाळून खाक झाल्याने पक्षी सैरभैर फिरत होते. हे चित्र मनाला हेलावून टाकणारे होते.
प्रत्येक गावातील जबाबदार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वणवा लावणाऱ्या लोकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी वेळ द्यावा. आपली स्वतःची जबाबदारी समजून या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे. जंगल संपत्ती हा आपल्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, ही अपेक्षा आहे. वन विभाग व निसर्गप्रेमी करत असलेल्या प्रयत्नात सहभागी व्हावे, ही सर्वांकडून अपेक्षा आहे; परंतु तसे होताना दिसत नाही, वन विभागाने दोन समाजकंटकांना वणवा लावल्याप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून किती ठिकाणी वणवा लावला, याची माहिती काढण्याचे काम चालू आहे.
(चौकट)
वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
पसरणी घाटातील गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठा वणवा होता. यावर उपाय म्हणजे वणवा लागू नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गावोगावी वणवाविरोधी पथके व बातमी मिळविणारे गुप्तहेर तयार करावे लागतील. वणवा लावणाऱ्या लोकांना कठोर शिक्षा व मोठ्या रकमेचा दंड केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे नेत्यांनी अशा लोकांना पाठीशी घालू नये व वन विभागावर दबाव आणू नये. उलटपक्षी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी वन विभागाला सहकार्य करावे.
कोट..
निसर्गाचा प्रश्न गंभीर आहे. वणव्यामध्ये वन्यप्राणी, पक्षी, कीटक विविध प्रकारच्या वृक्षांच्या दुर्मीळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर तसेच डोंगरांना वणवा लावणाऱ्यांविरोधात वन विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वणवा लावणाऱ्यास दंड व शिक्षा होऊ शकते.
- महेश झांजुर्णे, वाई वनक्षेत्रपाल
१४वाई