सातारा बसस्थानकात होणार वाहनतळ
By Admin | Updated: November 21, 2014 00:26 IST2014-11-20T21:37:42+5:302014-11-21T00:26:48+5:30
सातारा विभाग : सीसीटीव्ही कॅमेरे अन् नियंत्रण कक्षासाठी निधीची तरतूद

सातारा बसस्थानकात होणार वाहनतळ
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात वाहनतळाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी चालू आर्थिक वर्षासाठी पाच कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील एक कोटी ७१ लाख बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत एसटी महामंडळ विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. प्रवाशांना आपल्या खेचण्यासाठी अत्याधुनिक व चकाचक बसस्थानक तयार करण्याचा विचार आहे. यामध्ये बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या विकास कामासाठी ५ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ७१ लाखांची तरतूद केली आहे. यासंदर्भात नियोजन विभागाने मे २०१४ मध्ये पत्रव्यवहार केला होता. हा सर्व निधी २०१४-१५ या वर्षातच खर्च करायचा आहे. शासनाच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये १९० सार्वजनिक क्षेत्रे व इतर उपक्रमाअंर्तगत राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाअंतर्गत बांधकाम व इतर सुविधा पुरविण्यासाठी सातारा बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी पाच कोटी ३२ लाखांचा तरतूद केली आहे. यामधून चालकवाहकांना विश्रांतिगृह, महिला वाहक व कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतिगृह, बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरण, आगाराच्या वाहनतळाचे क्राँक्रिटीकरण, सीसीटीव्ही व्यवस्थापक व नियंत्रण कक्ष व बस आत व बाहेर जाण्याच्या फाटकाचा समावेश आहे.
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी येततात. त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या ठिकाणी सशुल्क वाहनतळही नाही. एसटी गाड्यांना वाहनांचा अडथळा होऊ नये म्हणून पार्सल कार्यालयाच्या बाजूला लोखंडी अँगल लावून जागा केली आहे. मात्र, ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे यातून चांगली सोय होऊ शकते. (प्रतिनिधी)