मलकापुरात पार्किंग बेशिस्त; वाहतूक पोलीस कारवाईत व्यस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:48+5:302021-09-05T04:43:48+5:30

मलकापूर : मलकापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात वाहतुकीचे बेशिस्त वर्तन नेहमीच दिसून येत आहे. वाहनधारक कुठेही, कसेही पार्किंग करत ...

Parking unruly in Malkapur; Traffic police busy! | मलकापुरात पार्किंग बेशिस्त; वाहतूक पोलीस कारवाईत व्यस्त!

मलकापुरात पार्किंग बेशिस्त; वाहतूक पोलीस कारवाईत व्यस्त!

मलकापूर : मलकापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात वाहतुकीचे बेशिस्त वर्तन नेहमीच दिसून येत आहे. वाहनधारक कुठेही, कसेही पार्किंग करत सैराट झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. याउलट वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कसलीही उपाययोजना न करता वाहतूक पोलीस पावत्या फाडण्यात व्यस्त दिसत आहेत.

मलकापूर शहरातील शिवछावा चौक, शिवाजी चौक, मुख्य रस्ता, कोल्हापूर नाका, कृष्णा रुग्णालय परिसर, मलकापूर फाटा, दोन्ही उपमार्ग व कऱ्हाड - ढेबेवाडी रस्ता याठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अनेकवेळा वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असते. रस्त्यावरच पार्किंग करत असल्याने लोकांना त्यातूनच मार्ग काढत जावे लागत असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होऊन किरकोळ वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. याचबरोबर वडापची वाहने, हातगाडे, रिक्षा ही वाहने तर पोलिसांसह स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कोठेही लावली जात आहेत. शिवछावा चौक व कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डाणपुलाखाली अनेक वाहनधारक गाड्या पार्किंग करून उभे राहत असल्याने इतर वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक वाहनधारक रस्त्यावर पार्किंग करत असल्यामुळे मलकापुरातील ढेबेवाडी फाटा व मलकापूर फाटा भारती विद्यापीठ परिसर व कृष्णा हॉस्पिटलच्या आजूबाजूला पार्किंगचे रोजच तीनतेरा वाजत आहेत. पोलीस क्रेन दिवसातून एकदाच येत असल्याने लोकांवरील वचक कमी झाला आहे. याठिकाणी पूर्णवेळ पोलीस कर्मचारी नसल्याने वाहनधारकांचे बेशिस्त वर्तन दिसून येत आहे. कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात; परंतु ते पावत्या फाडण्यात जास्त व्यस्त असल्याचे दिसून येते. शिवछावा चौकात केसेस करण्यापुरतेच पोलीस हजेरी लावतात. त्यावेळीही वाहतूक व पार्किंगला शिस्त लावण्याऐवजी पावत्या करून केसेस वाढविण्यास प्राधान्य दिले जाते. वाहतुकीला शिस्त लावणारे पोलीस कर्मचारी पावती पुस्तकातून डोके वर काढून या बेशिस्त पार्किंगकडे बघणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

चौकट

वाहनामधील व्यावसायिकांची रस्त्यावरच दुकानदारी...

कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गांवर व कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे लावले आहेत. तर वाहनातून व्यवसाय करणाऱ्यांची दिवसभर रस्त्यांवरच दुकानदारी सुरू असते. काही ठिकाणी फूटपाथवर दुकाने तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होऊन अपघात घडले आहेत. आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.

(चौकट)

पोलिसांसमोरच वडाप...

कोल्हापूर नाका येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांचा ठिय्या असतो. मात्र, येथील दोन्ही बाजूच्या उपमार्गांवर पोलिसांसमोरच वडापवाले रस्त्यावरच वाहने उभी करून राजरोसपणे वडाप करत असतात. याठिकाणी कर्तव्य बजावणारे पोलीस मात्र या बाबीकडे अर्थपूर्ण तडजोडीमुळे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

०४ मलकापूर

येथील शिवछावा चौकासह रुग्णालय परिसरात अनेक हौसे-गवसे वाहने रस्त्यांवरच पार्किंग करून तासनतास हॉटेलमध्ये गप्पा मारत बसल्यामुळे व्यापाऱ्यांसह वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)

040921\img_20210904_105811.jpg

फोटो कॕप्शन

येथील शिवछावा चौकासह रूग्णालय परिसरात अनेक हौसे-गवसे वाहने रस्त्यांवरच पार्किंग करून तासंतास हॉटेलमध्ये गप्पा मारत बसल्यामुळे व्यापाऱ्यासह वाहतूकीस अडथळा निर्माण करत आहेत. (छाया-माणिक डोंगरे)

Web Title: Parking unruly in Malkapur; Traffic police busy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.