पार्किंगचा ठेका साडेबारा लाखांना!
By Admin | Updated: December 25, 2014 00:05 IST2014-12-24T23:25:03+5:302014-12-25T00:05:29+5:30
मांढरदेव : चार ते सहा जानेवारी दरम्यान यात्रा

पार्किंगचा ठेका साडेबारा लाखांना!
मांढरदेव : मांढरदेव, ता. वाई येथील यात्रेचा वाहनतळाचा ठेका १२ लाख ५१ हजारांना भुर्इंज येथील प्रकाश पावशे यांना देण्यात आला आहे. यावर्षी काळूबाईची यात्रा दि. ४ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान होत आहे. यात्रा कालावधीत महिनाभरासाठी वाहनतळाचा ठेका दिला जातो. यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांकडून पार्किंगचे भाडे आकारले जाते. काळूबाई यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांकडून पार्किंगचे भाडे आकारले जाते. काळूबाई यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. सर्व वाहने मांढरदेव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर लावली जातात. या शेतकऱ्यांच्या जमिनीचे, पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो. शेतकऱ्यांची असणारी भूमाता शेतकरी संस्था हा ठेका दरवर्षी देते. चालूवर्षी १ ते ३१ जानेवारी दरम्यान वाहनतळाचा ठेका देण्यात आला आहे.
यावर्षी अमोल पवार, गिरीश गाढवे व प्रकाश पावशे या तिघांनी वाहनतळासाठी निविदा भरलेल्या होत्या. यातील प्रकाश पावशे यांनी सर्वाधिक १२ लाख ५१ हजार रक्कम देत वाहनतळाचा ठेका घेतला.
यात्रा कालावधीत वाहनतळाची जागा, रस्ता व वाहनतळाचे बॅरागेटस् लावणे आदी कामे भूमाता शेतकरी संघटना व संबंधित वाहनतळ ठेकेदाराची राहणार आहे.
दरम्यान, यात्रा दि. ४ पासून सुरू होत आहे. (वार्ताहर)
दुचाकीला दहा, बसला १०० रुपये
काळूबाई यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी अशी रक्कम आकारली जाईल. दुचाकी १० रुपये, तीनचाकी रिक्षा १५ रुपये, कार- २५ रुपये, जीप, टेम्पो, पीकअप-५० रुपये, ट्रक, बस, ट्रॅव्हल्स- १०० रुपयांप्रमाणे मांढरदेव येथे होणाऱ्या वाहनांना वाहनतळाचे भाडे द्यावे लागेल.