पार्किंगमधील दुचाकी हातोहात लंपास !

By Admin | Updated: November 13, 2015 23:43 IST2015-11-13T21:43:17+5:302015-11-13T23:43:27+5:30

चोरट्यांनी उडविली झोप : दुचाकी मालकांच्या पोलीस ठाण्यात चकरा, खबरदारी घेऊनही थांबेना चोरी; पोलीसही हतबल-कऱ्हाड फोकस

Parking bike in the parking lot! | पार्किंगमधील दुचाकी हातोहात लंपास !

पार्किंगमधील दुचाकी हातोहात लंपास !

कऱ्हाड : दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना तशा नवीन नाहीत; पण चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांनी शोधून काढली तर सामान्यांसाठी नक्कीच ती ‘विशेष खबर’ असते़ सध्या शहर पोलिसांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दोनशेहून अधिक दुचाकींचा तपास ‘पेंडिंग’ आहे़ पोलिसांनी संबंधित दुचाकींच्या तपासाची ‘फाईल’ही ‘क्लोज’ केली असण्याची शक्यता आहे. पण, चोरीस गेलेली आपली दुचाकी सापडेल, या आशेने काही दुचाकीधारक आजही पोलिसांत चकरा मारीत असल्याचे दिसते़
कऱ्हाड शहरातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ रस्त्याकडेला अथवा ‘पार्किंग झोन’मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरटे हातोहात लंपास करीत आहेत़ दुचाकी चोरताना बहुतांश वेळा चोरट्यांकडून बनावट चाव्यांचा वापर करण्यात येतो़ मात्र, काही चोरटे ‘लॉक’ खराब झालेल्या दुचाकींवर लक्ष ठेवून असतात़ तसेच नवीन गाडीचे वायरिंग सोडवूनही त्या लंपास केल्या जातात़ चोरलेल्या दुचाकींचा परजिल्ह्यात व्यवहार करण्यात येतो़ कागदपत्रे नसल्याने अत्यल्प किमतीमध्ये त्या विकल्या जातात़ दुचाकी चोरीस गेल्यानंतर संबंधित दुचाकीचा मालक पोलीस ठाण्यात जाऊन्सा चोरीची रितसर फिर्याद दाखल करतो़ पोलीसही फिर्याद नोंदवून घेऊन तपास सुरू करतात; पण पुढे त्या तपासाचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर दुचाकी मालकाला मिळतच नाही़
काही वर्षांपूर्वी दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असायच्या. त्यामुळे त्याचा गांभीर्याने तपासही व्हायचा. चोरटा हाताला लागलाच तर चोरीची दुचाकीही हस्तगत व्हायची. मात्र, सध्याची स्थिती धक्कादायक आहे. दररोज दुचाकी चोरीच्या घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतायत. त्यामुळे दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार पोलिसांसह वाहनधारकांनाही नवीन राहिलेले नाहीत. दुचाकी चोरणाऱ्यांमध्ये काही स्थानिकांचा हात असतो. कधीकधी अशा गुन्ह्यात एखादी परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील टोळी उघडकीस येते. खबऱ्यांकडून मिळालेली माहिती किंवा वाहन तपासणीवेळी एखादी संशयास्पद दुचाकी आढळली तर पोलीस त्या दुचाकीधारकाकडून संबंधित दुचाकी हस्तांतरणाची साखळी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच पुढे चोरांची टोळी समोर येते व त्यांच्याकडून काही दुचाकी हस्तगत केल्या जातात. दुचाकी चोरली की ती कोणाला ओळखू नये, याची खबरदारी चोरट्यांकडून घेतली जाते. त्यासाठी दुचाकीवर पुर्वीपासुन असलेले रेडीयम व नावे खोडून काढली जातात. व नंबरप्लेटवरील नंबर बदलला जातो.
चोरीच्या दुचाकीचा तपास जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच दुचाकी चोरीस जाऊ नये, यासाठी वाहनधारकांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे. बहुतांश दुचाकीधारक रस्त्याकडेला बिनधास्तपणे गाडी पार्क करून निघून जातात. आपली दुचाकी लॉक झाली आहे की नाही, याची साधी खातरजमाही त्यांच्याकडून केली जात नाही. तसेच दुचाकीचे लॉक खराब झाले असेल किंवा वायरिंग सुस्थितीत नसेल तर त्याची दुरुस्ती करण्याबाबतही टाळाटाळ केली जाते. परिणामी, चोरट्यांना ही आयती संधी चालून येते. दुचाकीस्वार गाडी पार्क करून जाताच चोरटे लॉक तुटलेल्या किंवा कमकुवत असलेल्या
दुचाकी हेरून त्या हातोहात लंपास करतात.
दुचाकी चोरण्यासाठी त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या चाव्या उपलब्ध असतात. त्यामुळे लॉक खराब झाले असल्यास कोणत्या ना कोणत्या चावीने ते सहज निघते. (प्रतिनिधी)


चैनीसाठी केली जाते चोरी
दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने यापूर्वी काहीजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता फक्त मौजमजा व चैन करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे अनेकांनी सांगितले. या टोळीमध्ये बहुतांशवेळा महाविद्यालयीन युवकही पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते या प्रकरणात गुंतल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे.
किरकोळ किमतीला विक्री
चोरून आणलेली दुचाकी बहुतांशवेळा जिल्ह्याबाहेर विकल्या जातात. त्यासाठी परजिल्ह्यातील एखाद्या गुन्हेगारास हाताशी धरले जाते. संबंधित दुचाकी कितीही चांगली असली तरी त्याची कागदपत्रे हाती नसल्यामुळे अशा दुचाकी पाच ते दहा हजारांनाही विकल्या जातात. कमी पैशात दुचाकी मिळत असल्याने अनेकजण कागदपत्रांची खातरजमा न करता अशा दुचाकी खरेदी करतात.


दहा वर्षे : सहाशेहून अधिक दुचाकी चोरीस
कऱ्हाड शहर पोलिसांच्या हद्दीतून गत दहा वर्षांत सहाशेहून अधिक दुचाकी चोरीस गेल्या आहेत़ त्यापैकी काही दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेक दुचाकींचा तपास वर्षानुवर्ष पेंडिंग आहे. संबंधित दुचाकी सध्या रस्त्यावर असतील की नाही, याबाबतही शंका आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी चोरीस गेलेल्या व अद्याप न सापडलेल्या दुचाकीच्या मालकांनीही संबंधित दुचाकीचा विचार करणे सोडून दिल्याचे दिसते.


दुचाकी पार्क करताना खबरदारी घेतली तर या चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल. ‘हॅण्डल लॉक’वर विसंबून न राहता दुचाकीधारकांनी टायरला लावण्यासाठी आवश्यक असणारे लॉक वापरावे. दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस वारंवार वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करतात. तसेच इतर मार्गानेही अशा टोळ्यांचा तपास सुरू असतो. एखादी टोळी उघडकीस आली तर त्या टोळीकडून चोरीच्या जास्तीत जास्त दुचाकी हस्तगत करण्याच्या दृष्टीने तपास केला जातो.
- बी. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कऱ्हाड

Web Title: Parking bike in the parking lot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.