‘आई-वडील, मुलाची काळजी घ्या...’ स्टेटस ठेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:33+5:302021-02-09T04:41:33+5:30

महाबळेश्वर : मोबाइलवर ‘माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या’, एवढा मेसेज लिहून महाबळेश्वरमधील क्रिकेट खेळाडू संदीप सुभाष भिलारे ...

‘Parents, take care of the child ...’ Suicide with status | ‘आई-वडील, मुलाची काळजी घ्या...’ स्टेटस ठेवून आत्महत्या

‘आई-वडील, मुलाची काळजी घ्या...’ स्टेटस ठेवून आत्महत्या

महाबळेश्वर : मोबाइलवर ‘माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या’, एवढा मेसेज लिहून महाबळेश्वरमधील क्रिकेट खेळाडू संदीप सुभाष भिलारे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती अशी की, येथील स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यातील अष्टपैलू खेळाडू संदीप सुभाष भिलारे (वय ३५, रा. गणेशनगर हौसिंग सोसायटी) याने आपल्या मोबाइल स्टेटसला ‘माझ्या आईवडिलांची व मुलाची काळजी घ्या’, असा मजकूर ठेवला होता. संदीपचा हा स्टेटस पाहून मित्र व नातेवाईकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती. त्यापैकी काही मित्रांनी संदीपच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. संदीपचा मेहुणा सागर शिंदे हा आपल्या मित्रांना बरोबर घेऊन संदीपच्या घरी गेला. तेथे संदीपच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेक हाका मारल्या, दारावरची बेल वाजवली तरी संदीपने घराचा दरवाजा उघडला नाही, म्हणून सागरने दरवाजा जबरदस्तीने उघडला. यावेळी संदीपने साडीच्या मदतीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे दिसून आले. संदीपला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून संदीप याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

संदीप याचा प्रेमविवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. त्याचा पहिला वाढदिवस १५ जानेवारीला थाटामाटात साजरा केला होता. अशा गुणी खेळाडूच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: ‘Parents, take care of the child ...’ Suicide with status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.