मुलांच्या काळजीनं पालकांच्या शाळेत चकरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 21:50 IST2015-08-12T21:50:49+5:302015-08-12T21:50:49+5:30
खंडाळा तालुका : शाळकरी मुलांमध्येही अफवांची भीती; सोशलमिडियाचा वापर जपून करण्याच्या पोलिसांच्या सूचना फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

मुलांच्या काळजीनं पालकांच्या शाळेत चकरा!
दशरथ ननावरे- खंडाळा
चोर आला... एवढं दोन शब्दांचं वाक्य कानावर पडलं तरी भल्याभल्यांना पळता भुई थोडी होते. खंडाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून गावोगावी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातायेत. शाळकरी मुलांच्या मनामध्येही चोरांविषयी भीती निर्माण झाली आहे. वाडी-वस्तीवरील शेजारच्या गावात जाणारी शाळकरी मुले जीव मुठीत घेऊन जात आहेत. पालकांनाही काळजी लागून राहिल्याने एरव्ही बोलावल्याशिवाय शाळेत न येणारे पालकही वारंवार शाळेत चकरा मारू लागले आहेत.
बाहेरील राज्यातून काही टोळ्या जिल्ह्यात उतरल्या असून त्या तालुक्यात गावोगावी पसरल्या आहेत. अमूक एका गावात जोडप्यांना मारहाण केली, शाळकरी मुलांना पळविले, लूटमार केली. तमूक गावात दोघाचौघांना पकडले आहे. सर्वांनी सावध राहा अशा अफवा पसरल्या आहेत. सोशलमिडियावर या अफवांचा फोटोसह धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे चोरट्यांपेक्षा अफवांचीच भीती अधिक पसरली आहे.
तर रानात जाणाऱ्या मजुरांनाही भिती वाटत असल्याने अनेकजण घरीच बसणे पसंद करीत आहेत. गावोगावी रात्रीच्यावेळी तरुणांनी गस्त चालू केली आहे.
तालुक्यातील बहुतांशी गावातून मी स्वत: फेरी मारली आहे. चोरांची निव्वळ अफवा आहे. तरुणांनी सावधपणे सोशल मिडियाचा वापर करावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. रात्रफेरीसाठी पोलिस गाड्या फिरत आहेत.
- अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, खंडाळा
चोरांच्या भीतीने मुलांमध्ये घबराट पसरली होती. चर्चेमुळे शाळेतही मुलांमध्ये आपसात अशीच चर्चा होती; परंतु कुठेही असा प्रकार घडला नसल्याचे मुलांना सांगितले आहे. तसेच पालकांनाही सूचित केले आहे. दैनंदिन कामकाज सुरू आहे.
- आर. के. जाधव, मुख्याध्यापक
रात्री रानमाळावरील शेतात एखादा शेतकरी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी बॅटरी घेऊन गेला तरी चोर आल्याची खबर गावात पोहचतेय. तरुणांचा जथ्या लगेच माळरानावर पोहोचतोय. चौकाचौकात बुजुर्ग मंडळी गप्पा मारीत घरांची राखण करीत असतानाचे चित्र दिसत आहे.