दीपक देशमुखसातारा : मृत्यू कधी कधी अशी वेळ साधून येतो की जीवाभावाची माणसंही नेमकी त्याचवेळी शेकडो मैलांवर अडकलेली असतात. याचीच प्रचिती मर्चंट नेव्हीत सध्या मध्यपूर्वेत तैनात असलेल्या मुलाला आली. भारतापासून शेकडो मैलांवर एका मालमाहू जहाजावर असताना हृदयविकाराने वडिलांचे निधन झाल्याचे त्याला कळले. मात्र, वडिलांचे अंतिम दर्शन घेणे युद्धजन्य परिस्थितीमुळे शक्य नव्हते. समुद्रात उभ्या जहाजातूनच व्हिडिओ कॉलवरून वडिलांचा अंत्यविधी पाहिला अन् आपल्या जन्मदात्या पित्याचे अंतिम दर्शन डोळे भरून पाहिले.सातारा येथे करंजे येथील दीपक भिकू फडतरे यांचा मुलगा पंकज जानेवारी २०२४ मध्ये मर्चंट नेव्हीमध्ये रुजू झाला. फडतरे हे कधी तेलवाहू तर कधी अन्नधान्य, खाद्यसामग्री असणाऱ्या जहाजावर तैनात असतात. या काळात फोनवरून वडिलांशी संवाद सुरू असायचा. नोव्हेंबर २०२५ मध्ये करंजेतील घरी आले व महिनाभर राहून कर्तव्यावर रुजू झाले. सर्व काही व्यवस्थित सुरू असताच मार्चमध्ये इराणमध्येयुद्धाचा आगडोंब उसळला.या युद्धात इतरही शेजारील देशही भरडले जाऊ लागले. मध्यपूर्वेत असणाऱ्या सर्वच जहाजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. फडतरे ज्या जहाजावर कार्यरत आहेत, ते जहाजही नेमके याच टापूत पण समुद्रात उभे आहे. यामुळे दीपक भिकू फडतरे यांच्या मनातही कालवाकालव झाली. त्यांनी काळजीपोटी मुलाची विचारपूस करून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. मुलाने धोका नसल्याचे सांगत त्यांना आश्वस्त केले. तथापि, दि. ३ रोजी पहाटे १ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊन अवघ्या ५६ व्या वर्षी निधन झाले.कुटुंबीयांनी तातडीने मुलगा पंकज याच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. वडिलांच्या मृत्यूने हादरून गेलेल्या पंकज यांच्यासमोर तातडीने येण्यासाठी काहीच साधन नसल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. पंकज घरी येईपर्यंत थोडे थांबू, असा विचार करून रुग्णालयातील शवागारात मृतदेह ठेवण्याचा पर्याय समोर आला. परंतु, पंकज किती दिवसात पोहोचतील, याची शाश्वती नसल्यामुळे अंत्यविधी नियोजित वेळेत करावा लागला. पंकज यांना पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देता आला नाही. व्हिडिओ काॅलद्वारेच जहाजावरून त्यांनी वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
क्रू मेंबरची साथ पण परिस्थिती कठीणपंकज फडतरे ज्या जहाजावर आहेत, त्या क्रू मेंबर्सनी त्यांना धीर दिला. सध्या त्यांचे जहाज दुबईपासून १३० किलोमीटरवर खोरा फकन बंदराच्या जवळपास आहे. तेथे जहाज गेल्यास तेथून पंकज यांना भारतात परतता येईल. त्यासाठी बदली कर्मचारी उपलब्ध नसले तरी ती जबाबदारी घेण्याचीही तयारी सहकाऱ्यांनी दाखवली आहे. परंतु, परिस्थिती त्यांच्याही हातात राहिली नाही.
किमान तेराव्याला येईलअंत्यविधी झाला तरी पंकज फडतरे किमान रक्षा विसर्जनाला येतील. तोपर्यंत जरी नाही येता आले तरी वडिलांच्या दशक्रिया किंवा तेरावा विधीला तरी उपस्थित राहील, अशी आशा कुटुंबीयांना आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावरूनही प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Web Summary : Merchant navy son, Pankaj Fadtare, stuck amidst US-Iran tensions, witnessed his father's funeral via video call. Unable to return home from the Middle East due to war, he watched the last rites from his ship, a poignant moment of grief and helplessness.
Web Summary : अमेरिकी-ईरान तनाव के बीच फंसे मर्चेंट नेवी के बेटे पंकज फडतरे ने वीडियो कॉल पर अपने पिता का अंतिम संस्कार देखा। युद्ध के कारण मध्य पूर्व से घर लौटने में असमर्थ, उन्होंने जहाज से अंतिम संस्कार देखा, जो दुख और बेबसी का मार्मिक क्षण था।