झुंडीने फिरणाऱ्या भटक्या श्वानांची दोन गावात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:55+5:302021-02-05T09:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : एक तरूणी आणि एका तरूणाचा श्वान चावल्याने मृत्यू झाल्याने डबेवाडी आणि जकातवाडी या दोन्ही ...

झुंडीने फिरणाऱ्या भटक्या श्वानांची दोन गावात दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एक तरूणी आणि एका तरूणाचा श्वान चावल्याने मृत्यू झाल्याने डबेवाडी आणि जकातवाडी या दोन्ही गावांमध्ये अद्यापही भटक्या श्वानांची दहशत आहे. झुंडीने फिरणारे भटके श्वान दिसल्यास नागरिकांच्या काळजात धस्स होऊ लागले आहे.
सोनगाव कचरा डेपोमध्ये शिळे अन्न व मांस टाकले जाते. त्यामुळे हे अन्न व मांस खाण्यासाठी भटके श्वान याठिकाणी वारंवार येत असतात. गेल्या महिनाभरापासून पंधरा ते वीस भटके श्वान या परिसरात झुंडीने फिरत आहेत. त्यातीलच एका पिसाळलेल्या श्वानाने रुपाली माने आणि देवानंद लोंढे यांचा जीव घेतला तर पाचजणांना जखमी केले आहे. या पाचही जणांवर उपचार सुरु आहेत. यामधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
सोनगाव कचरा डेपो परिसरात जकातवाडी आणि डबेवाडीतील ग्रामस्थांची शेती आहे. शेतीकामाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर भटके श्वान दिसल्यास ग्रामस्थ भयभीत होत आहेत. या पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. पिसाळलेला श्वान अद्यापही सापडला नसून, या श्वानाची दहशत गावात कायम आहे. या श्वानाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही गावातील युवकांनी या पिसाळलेल्या श्वानाचा शोध सुरू केला आहे. हातात काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन युवक आजूबाजूच्या शेतात फिरत आहेत. जेणेकरून आणखी कोणाचा नाहक जीव जाऊ नये, यासाठी युवकांनी या पिसाळलेल्या श्वानाची शोधमोहीम हाती घेतली आहे.
चौकट : सर्तकतेचे लावा फलक...
सोनगाव कचरा डेपो परिसरामध्ये भटके श्वान फिरत आहेत. येथून ये-जा करणाऱ्यांवर हे श्वान अचानक हल्ला करू शकतात. त्यामुळे नागरिकांच्या सतर्कतेसाठी याठिकाणी सूचना फलक लावावेत, अशी मागणीही डबेवाडी आणि जकातवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
कोट : श्वान चावल्यानंतर डोस पूर्ण घ्या
श्वान चावल्यानंतर वास्तविक पाच इंजेक्शन दिली जातात. परंतु, थोडे बरे वाटले की, अनेकजण इंजेक्शन घेत नाहीत. परिणामी अंगात विष भिनल्यानंतर पुन्हा त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच पाच इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.