पंढरीच्या वाटेने निघाली ‘व्यसनमुक्तीची वारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:51 IST2019-06-29T22:50:58+5:302019-06-29T22:51:03+5:30
स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या ...

पंढरीच्या वाटेने निघाली ‘व्यसनमुक्तीची वारी’
स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्यामध्ये ४२७ पेक्षा जास्त दिंड्या सहभागी झाल्या आहे. त्यामधील ‘दारूत रंगला, संसार भंगला, संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू,’ असा संदेश देणारे वारकरी सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
‘माउली-माउली...’ अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिवे घाटातून साडेचार किलो मीटरचे नागमोडी अंतर पार करून सासवड येथे दाखल झाला. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हरिनामाचा जप करीत वारीत सहभागी झाले आहेत.
टाळ-मृदुंगचा तालावर व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांनी ‘दारूत रंगला, संसार भंगला, संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू,’ असा संदेश देत ‘वारी व्यसनमुक्तीची’या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली.
कीर्तनकार बंडातात्या कºहाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती संघाच्या वतीने वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, गोशाळा आदी विविध विषयांवर काम सुरू आहे. व्यसनमुक्ती चळवळींमध्ये काम करत असताना गावपातळीवर व तालुका पातळीवर युवकांचे तसेच ग्रामस्थांचे संपूर्ण महाराष्ट्रभरात सुमारे २०० पेक्षा अधिक शिबिरे अथवा मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पंधराशे तर दोन हजार युवकांना एकत्रित करून दरवर्षी राज्य पातळीवर चार दिवसांची १४ शिबिरे घेतली असून, या माध्यमातून हजारो युवकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली आहे.
त्याचबरोबर गुटखा विक्री व अवैध दारूविक्रीच्या विरोधात युवकांनी व महिलांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून शासनाला दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे विविध पातळीवर काम करीत असताना पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत लाखो लोक सहभागी होतात. त्यामध्ये विविध स्तरातून आलेल्या लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यासाठी व्यसनमुक्ती संघाच्या वतीने वारी व्यसनमुक्तीची या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यात लोकांना दारू, गुटका व तंबाखू व्यसनापासून सुटका होण्यासाठी प्रबोधन केले जात आहे.
दारूबंदीसाठी सह्यांची मोहीम...
राज्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे इतर सर्व जिल्ह्यांमध्येही दारूबंदीचा निर्णय व्हावा, यासाठी मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती युवक संघाच्या माध्यमातून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. ते लाखो लोकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.