पाचवडमध्ये जातपंचायतीला मूठमाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:48 IST2016-03-06T00:44:15+5:302016-03-06T00:48:31+5:30

यापुढे पोलिसांत मागणार दाद : गोपाळ समाजाचा परिवर्तनाचा निर्णय

Panchayataya pada panchayat to bury! | पाचवडमध्ये जातपंचायतीला मूठमाती !

पाचवडमध्ये जातपंचायतीला मूठमाती !

राहुल तांबोळी - भुर्इंज
‘यापुढे जातपंचायतीत नव्हे तर थेट पोलीस ठाण्यातच दाद मागायची,’ असा महत्त्वपूर्ण निर्णय पाचवड येथील गोपाळ समाज बांधवांनी शनिवारी एकमताने घेऊन ‘जातपंचायतीला मूठमाती’ देण्याचा निर्धार केला.
पाचवड येथे शनिवारी झालेल्या गोपाळ समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक सुधारणेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. दरम्यान, गुरुवारी ज्या ठिकाणी हा अघोरी प्रकार घडला, त्याच जागेत परिवर्तनाचा निर्णय घेतला.
पाचवड येथील गोपाळ समाजातील जातपंचायतीत बाप-लेकीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर पोलिसांनी १२ तासांनंतर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली. या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध संघटनांनी आवाज उठवून जातपंचायतीची अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कोणी सांगण्यापूर्वीच या वस्तीतील बांधवांनी एकत्र येऊन यापुढे काही घडले तर जातपंचायतीत नाही तर पोलीस ठाण्यात दाद मागणार असल्याचे सांगितले.
पाचवडच्या गोपाळ समाजात शनिवारीही भीतीचे वातावरण होते. या वस्तीतील पुरुष बँड पथकात वाजविण्याचे काम करून आपले पोट भरतात. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेकजण बँड वाजविण्यासाठी बाहेर गेले होते; मात्र दोन दिवस झालेल्या त्रासामुळे या सर्वांनीच जातपंचायतीबाबत विचार करण्यास शुक़्रवारपासून सुरुवात केली. ज्या ठिकाणी गुरुवारी जातपंचायत भरली होती, त्याच ठिकाणी एकत्र येऊन जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला.
‘भाऊ लई तरास झाला बघ, पोलिसांनी माणसं धरून नेल्याती. वाजवाय गेल्याशिवाय पोटाला मिळत नाय. जे पहिल्यापासून चालत आलं होतं तेच आजपतुर पुढं चालत होतं. हे चुकीचं हाय असं कुणीबी सांगाय कधी आलं नाय; पण आता हे चुकीचं असल्याचं समजू लागलंय. यापुढं असलं काय आमच्या इथं होणार नाय. जे काय असंल ते पोलिसांकडं दाद मागू; पण जातपंचायतीकडं कधीच जाणार नाय बघा,’ अशीच प्रतिक्रिया यावेळी गोपाळ बांधवांनी दिली.
यावेळी सोना पवार, वसंत जाधव, संजय जाधव, गणेश पवार, प्रकाश पवार, अरुण जाधव, सागर पवार, दिलीप पवार, सचिन जाधव, सायबू जाधव, दत्तू जाधव, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते.
यावेळी वस्तीत अनेक महिलांही होत्या; मात्र त्या झोपडीतून बाहेर आल्या नाहीत. झालेला निर्णय या सर्वांनी जेंव्हा महिलांना सांगितला तेव्हा त्यांनीही ‘यापुढं असलं काय नकोच,’ असे सांगून या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Panchayataya pada panchayat to bury!