पंचायत समितीचा एक दिवस स्वच्छतेसाठी
By Admin | Updated: June 9, 2015 00:11 IST2015-06-08T21:48:35+5:302015-06-09T00:11:18+5:30
सचिन घाडगे यांचा संकल्प : दर शनिवारी दोन तास होणार स्वच्छता

पंचायत समितीचा एक दिवस स्वच्छतेसाठी
परळी : सातारा पंचायत समितीमध्ये नव्याने रूजू झालेले गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या संकल्पनेतून तसेच सभापती कविता चव्हाण, उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी साडेदहा ते साडेबारा अशी दीड तास पंचायत समितीच्या सर्व दालनांसह परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी पंचायत समितीही सरसावली आहे. तत्पूर्वी विस्तार अधिकारी सचिन घाडगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी सर्वांनी दर शनिवारी दोन तास पंचायत समितीत स्वेच्छेने स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला.
अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कारभारामध्ये सुसूत्रता, वेळेचे पालन, सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात या त्रिसूत्रीबरोबरच आपले कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्याचा कानमंत्र दिला होता. ही बैठक झाल्यानंतर दोनच दिवसांनंतर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सभापती कविता चव्हाण, उपसभापती सूर्यकांत पडवळ यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. पंचायत समितीमधील आरोग्य विभाग, शिक्षण, बांधकाम, पशुसंवर्धन, सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण, एनआरएचएम या विभागांसह सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
जोडीने स्वच्छता मोहीम
सभापती कविता चव्हाण या पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करीत असताना त्यांचे पती व नेसघरचे सरपंच जयराम चव्हण हे तेथे आले असता सर्व लोक स्वच्छता करताहेत हे पाहून त्यांनीही त्यांच्या पत्नीसमवेत हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
दारूंच्या बाटल्यांचा ढीग
अधिकारी, पदाधिकारी स्वच्छता करीत असताना त्यांना मोकळ्या दारूच्या बाटल्या आणि कोंबडीच्या पिसांचा खच पंचायत समितीच्या परिसरात आढळून आला. त्यामुळे रात्रीच्या सुमारास बाहेरील काही अपप्रवृत्त्या त्या ठिकाणी ‘ओल्या पार्ट्या’करीत असावेत, अशी शक्यता काहीनी व्यक्त केली आहे.