पंचायत समितीत ‘गोष्ट छोटी कडबाकुट्टीएवढी’!
By Admin | Updated: April 7, 2016 23:49 IST2016-04-07T22:55:02+5:302016-04-07T23:49:58+5:30
कारण-राजकारण : पंचायत समितीत महिला सदस्यांच्या पतींच्या उचापती वाढल्या

पंचायत समितीत ‘गोष्ट छोटी कडबाकुट्टीएवढी’!
प्रमोद सुकरे-- कऱ्हाड -येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली; पण त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पार्टी मीटिंगमध्ये कडबाकुट्टीवरून झालेल्या गुऱ्हाळाची चर्चा राजकीय वर्तुळात जोराज सुरू आहे. त्यामुळे पंचायत समिती महिला सदस्यांच्या पतींच्या उचापती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘देव’ राज्यात हे चालतं तरी कसं, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. घडलं असं की, एप्रिलफुल दिनी म्हणजेच १ एप्रिलला पंचायत समितीची सभा नेहमीप्रमाणेच झाली. दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची टंचाई, कृषीची परिस्थिती, आरोग्य आदी विभागांचा आढावा झाला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. असाच एका विषयाचा आढावा घेताना संबंधित विभागाचे अधिकारी गैरहजर होते. ते आजारी असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. त्यांच्या आजारपणाबद्दल विरोधी सदस्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने सकाळी पार्टी मीटिंगला हजेरी लावल्याचे समोर आले. तेथे अधिकारी, पदाधिकारी आणि इतरांच्यात चांगलेच तू-तू मैं-मंै झाल्याची चर्चा सुरू आहे.
पार्टी मीटिंगमध्ये प्रत्यक्ष सदस्य नसणाऱ्या एकाने काही अधिकारी ऐकत नसल्याचे, मनमानी करीत असल्याची तक्रार करीत वादाचे जणू रणशिंग फुंकले. मग ‘देव’ माणसाच्या समोर ‘त्या’ अधिकाऱ्याला बोलविण्यात आलं.
बराच वेळ ‘धीर’ धरलेल्या एका पाटलांनीही तोंडसुख घेतले. तर नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या एका सदस्याने ‘लक्ष्मण’रेषा ओलांडली म्हणे!, ‘बिचारे डॉक्टर मात्र शांतपणे सारं ऐकून घेत होते. खरंतर ‘गोष्ट छोटी कडबाकुट्टीएवढी.’ कडबाकुट्टी वाटपाच्या कार्यक्रमाला आम्हाला का बोलवलं नाही, कोणताही कार्यक्रम असला तर आम्हाला बोलवलं पाहिजे, लाभार्थींची नावे आम्हाला विचारल्याशिवाय ठरवायची नाहीत, अशा अनेक गोष्टींवर ‘काबाडकष्ट’ करून निवडून आलेल्यांनी अन् आपल्या धर्मपत्नींना निवडून आणलेल्यांनी बराच वाद घातला; पण सरतेशेवटी संबंधित डॉक्टरनी माझे काम चांगले नसेल तर तशी प्रशासकीय कारवाई करा. माझा बदलीचा प्रस्ताव पाठवा, असे सांगून ते निघून गेले.
पार्टी मीटिंगमध्ये अवमान केल्याची भावना या वर्ग १ च्या अधिकाऱ्याच्या मनात निर्माण झाल्याने ते मासिक सभेला आले नाहीत, असे विरोधी बाकावरील सदस्यांचे मत आहे.
कऱ्हाड पंचायत समितीने ‘यशवंत पंचायत राज’ अभियानात पुणे विभागात प्रथम तर राज्यात दुसरा क्रमांक नुकताच मिळविला आहे. याचा अर्थ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे हे यश मिळू शकले.
मीटिंगला बोलविण्याचे कारण तरी काय?
खरंतर अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत असेल तर त्याची चर्चा मासिक सभेत होऊ शकते. यापूर्वी अशा अनेक अधिकाऱ्यांना सभागृहात निरूत्तर करण्यात आले आहे. मात्र, संबंधित वर्ग १ च्या अधिकाऱ्याला पार्टी मीटिंगमध्येच बोलवून का खडसावण्यात आले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. अधिकाऱ्याला पार्टी मीटिंगला बोलवण्याचं कारण तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गुऱ्हाळातून फलश्रुती होते का ?
पार्टी मीटिंगला अधिकाऱ्यांना बोलावून सदस्य नसणाऱ्यांनी त्यांना काहीही बोलणे परंपरेला साजेसे आहे का? त्यामुळे अधिकाऱ्यांचे मनौधैर्य खचणार तरी नाही ना? अशा चर्चेच्या गुऱ्हाळातून फलश्रुती होते का? याचा विचार कोण करणार?