समितीच्या इमारतीत नव्या योजनांची ‘पंचायत’
By Admin | Updated: November 4, 2015 23:59 IST2015-11-04T21:45:16+5:302015-11-04T23:59:32+5:30
कऱ्हाड पंचायत समिती : भित्तिपत्रकांच्या चिंध्या; नवे कोरे बोर्ड पडलेत धूळखात, नोटीसबोर्डवरील प्रसिद्धीपत्रकांची अवस्था गंभीर

समितीच्या इमारतीत नव्या योजनांची ‘पंचायत’
कऱ्हाड : १९८ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या कऱ्हाड पंचायत समितीमध्ये मात्र, योजनांच्या प्रसिद्धीबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. एखादी योजना कधी येते आणि कधी जाते याची माहिती मिळत नसल्याने मासिक सभेवेळी अधिकाऱ्यांवर आगपाखड करणाऱ्या पंचायत समितीमधील सदस्यांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंचायत समितीमध्ये सध्या लावण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ‘हात धुण्याचे टप्पे’, ‘पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम’, याविषयी माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी भित्तिपत्रके फाडून टाकण्यात आली असल्याने, योजनांची माहिती देखील या ठिकाणी आल्यास मिळू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नव्या योजनांची अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात नसल्याने नागरिकांसह सदस्यांचीही पंचाईत होत आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच काही दिवसांपूर्वी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायती स्तरावर स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सर्वांना केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील इतर तालुक्याप्रमाणे कऱ्हाड पंचायत समितीमध्येही एक दिवस महास्वच्छता अभियान राबविण्यात आले पण त्यानंतर या अभियानाचे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किती प्रमाणात गांभीर्य घेतले आहे. हे या ठिकाणी फाटलेल्या योजनांच्या भित्तिपत्रकांवरून तसेच येथील अस्वच्छतेकडे पाहिल्यावर दिसते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी व सभापती, उपसभापती यांनी ६ आॅक्टोबर रोजी महास्वच्छता अभियान राबविले. मात्र, आता हे किती तालुक्यातील पंचायत समितीमध्ये अभियान सातत्याने राबविले जात आहे. याचे संशोधन करणे गरजेचे आहे. कऱ्हाड पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या शासकीय कार्यालयाच्या स्वच्छतेमध्ये सातत्य राखले जात नसल्याचे दिसून येत आहे.
आता शासकीय योजनांच्या भिंतीवरील फलकांच्या दुरवस्थेमुळे सदस्यांतून अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
गठ्ठे ही अजून पडूनच..!
पंचायत समितीमधील शिक्षण विभागापाठीमागील बाजूस असलेल्या आडोशाच्या खोलीसमोर शासकीय योजनांचे तसेच माहितीच्या फायलींचे गठ्ठे गेल्या दोन महिन्यांपासून पडून आहेत. या गठ्ठ्यांमधून एखादी महत्त्वाची फाईल गहाळ झाल्यास त्याला जबाबदार कोणास धरले जाईल याचा विचार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे का ?
पार्किंगच्या गाड्यांच्या गराड्यात योजना फलक
शासकीय योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी या हेतूने शासकीय योजनांचे भित्तिपत्रके तसेच बॅनर तयार करण्यात आले. त्यांना शासकीय कार्यालयाबाहेर लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या. मात्र, त्या सूचनांचे कऱ्हाड पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कऱ्हाड पंचायत समिती इमारतीसमोर गाड्या पार्किंगच्या ठिकाणी योजनांचे फलक धूळखात पडलेले आहेत.