गाळ्यांसाठी पंचायत समिती निघाली लाभार्थींच्या शोधात
By Admin | Updated: April 15, 2015 23:55 IST2015-04-15T21:47:24+5:302015-04-15T23:55:34+5:30
ग्रामपंचायतींना नोटिसा : दारिद्र्यरेषेखालील बचत गटांचा शोध

गाळ्यांसाठी पंचायत समिती निघाली लाभार्थींच्या शोधात
सातारा : येथील राधिका रोडलगत असणाऱ्या प्रतापसिंह बझारला महिन्यापूर्वी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी टाळे लावले होते. मात्र, सध्या या बझारातील गाळे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थिंनींना देण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्या पंचायत समिती नवीन लाभार्थींच्या शोधात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचतगटातील महिलांना २००२ सालापासून देण्यात येत होते. दरम्यान, गाळे मालकांनी स्वत:चा व्यवसाय बंद करून पोट भाडेकरू ठेवण्यात आले. याच कालावधीत प्रशासनाने भेट दिली. त्यावेळी गाळ्यांमध्ये पोट भाडेकरू असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे प्रतापसिंह बझारला महिन्यापूर्वी टाळे लावण्यात आले होते. दारिद्र्यरेषेखालील बचत गटातील महिलांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार नाममात्र शुल्कात गाळे देण्यात येणार आहेत. या संदर्भात पंचायत समितीने ग्रामपंचायत कार्यालयांना नोटिसा देऊन गाळ्यांमध्ये व्यवसाय करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. व्यावसायिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजार उपलब्ध व्हावा. उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत दर्जेदार वस्तू रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रतापसिंह बझाराची निर्मिती करण्यात आलेली आहे.
गरजू महिला बचत गट किंवा व्यावसायिकांनी गाळे भाडेतत्त्वावर घेण्याबाबत अर्ज करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गाळे ताब्यात दिल्यानंतर व्यावसायिकांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा. त्यातून व्यवसाय वृद्धी करावी. जास्तीत जास्त व्यवसाय करून दारिद्र्यरेषेतून बाहेर पडावे. व्यवसायातून अधिकाधिक अर्थाजन केल्यामुळे त्यांना जीवनमान उंचवण्यास मदत होईल.
- चंद्रकांत जगताप, गटविकास अधिकारी