डोहाळे जेवण घालून गायीचे लाड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:17+5:302021-02-09T04:42:17+5:30
रहिमतपूर : नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदीआनंद असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले जाते. यात लेक किंवा ...

डोहाळे जेवण घालून गायीचे लाड !
रहिमतपूर : नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदीआनंद असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले जाते. यात लेक किंवा सुनेचे लाड केले जातात. हे चित्र सर्वत्रच पाहायला मिळतात; पण कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोलीत मात्र लाडक्या गीर गायीचे डोहाळे जेवण उत्साहात घालण्यात आले. यावेळी पंचपक्वान्नाचा बेत केला होता.
गेल्या काही वर्षांपूर्वी रहिमतपूर परिसरात देशी गाईची संख्या प्रचंड कमी झाली होती. अलीकडच्या काही वर्षांत गाईचे महत्त्व पटू लागल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांकडून देशी गाईचे संगोपन करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे रहिमतपूर परिसरातील अनेक गावांमध्ये देशी व गीर गाईची संख्या वाढू लागली आहे.
वाठार किरोली येथील विकास गायकवाड हे शेतकरी गीर गाईसह म्हैशींचेही संगोपन करतात. त्यांचा मुलगा विराज गायकवाड याच्या संकल्पनेतून गाईच्या डोहाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाईचे दूध लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी अत्यंत गुणकारी असते. गाईला शेतकरी मातेचा दर्जा देतात. त्यामुळे गाईचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
लाडक्या गाईच्या डोहाळे कार्यक्रमानिमित्त विकास गायकवाड यांनी गोठा व गायीला फुलांच्या माळांनी सजविले होते.
कार्यक्रमासाठी घराशेजारील महिला मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. गायीसाठी कळ्याचे लाडू, करंज्या, सजुऱ्या, तीन प्रकारचे पशुखाद्य डिश, केळीची फणी असे पंचपक्वान्न ठेवले होते. गाईच्या डोहाळे कार्यक्रमाचे कौतुक उपस्थित नागरिक करीत होते. या हटके कार्यक्रमाची चर्चा वाठर गावासह परिसरातील गावात व सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती.
चौकट
परिसरातील महिलांचीही उपस्थिती
कोणतेही शुभ कार्य म्हटल्यावर महिलांना निमंत्रण दिले जाते. त्याप्रमाणे गायकवाड कुटुंबांनीही परिसरातील महिलांना कार्यक्रमासाठी बोलावले होते. यामुळे उत्सहात आणखी भर पडली.
फोटो ०८रहिमतपूर
वाठार किरोली येथील विकास गायकवाड यांच्या घरी गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गोठा व गायीला फुलांनी सजविले होते. (छाया : जयदीप जाधव)