पालला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यावेळी भाविकांना मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:30+5:302021-01-23T04:40:30+5:30
पाल येथील खंडोबा-म्हाळसा मूर्तींच्या विवाह सोहळ्यासह होणारी यात्रा २३ ते २९ जानेवारी या कालावधीत दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणार होती. ...

पालला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यावेळी भाविकांना मनाई
पाल येथील खंडोबा-म्हाळसा मूर्तींच्या विवाह सोहळ्यासह होणारी यात्रा २३ ते २९ जानेवारी या कालावधीत दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणार होती. मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे विवाह सोहळा. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. यंदा ही यात्रा भरल्यास गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
यात्रा कालावधीत विवाह सोहळा, खंडोबा देवाची पूजाअर्चा, धार्मिक विधी मानकरी व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत केले जाणार आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच २३ ते २९ जानेवारी या यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुकाने, स्टॉल लावण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोणत्याही प्रकारे गर्दी होणारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
- चौकट
दर्शनासाठी मंदिर बंद
यात्रा कालावधीत धार्मिक विधी झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच धार्मिक विधीचे ठिकाण सोडून मंदिर परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.