पितृवियोगाचं दु:ख झाकून वठविलं ‘सोंग’
By Admin | Updated: April 18, 2015 00:08 IST2015-04-17T23:01:51+5:302015-04-18T00:08:01+5:30
हिंगणगाव : सावडण्याचा कार्यक्रम करून थेट यात्रेत; भिल्लाचा देखावा सादर करण्याची परंपरा राखली एका कलाकारानं !.

पितृवियोगाचं दु:ख झाकून वठविलं ‘सोंग’
सूर्यकांत निंबाळकर - आदर्की हिंगणगाव येथील वार्षिक यात्रेचे आकर्षण व अनेक वर्षांची पंरपरा असणारे भिल्लांचे सोंग यावर्षी सादर होणार का? गावची परंपरा अखंडित राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थांसमोर उभे होते; पण शरद कुंभार यांनी आपले पितृवियोगाचे दु:ख मागे ठेवत गावची पंरपरा अखंडित ठेवण्यासाठी भिल्लाचे सोंग सादर केले. यामुळे हिंगणगाव यात्रेतील परंपरा कायम टिकली आहे.
याबाबत माहिती अशी की, हिंगणगाव, ता. फलटण येथे दरवर्षी श्री भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा भरते. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भिल्लांचे सोंग याचा देखावा सादर करणे. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी आठ ते दहापर्यंत ऐतिहासिक व पौराणिक कथेवर भिलाचे सोंग सादर करण्याची ही अनेक वर्षांची परंपरा आहे. हा देखावा पाहण्यासाठी हिंगणगावबरोबरच परिसरातील हजारो ग्रामस्थ येतात.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी भोईटे घराण्यातील लोक भिल्लांचे सोंग सादर करीत होते. त्यानंतर मारुती कुंभार यांनी सलगपणे तीस वर्षे भिल्लाचे सोंग सादर केले. वृद्धापकाळामुळे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा शरद कुंभार हे गेल्या तेरा वर्षांपासून हे सोंग सादर करीत आहेत. असे असताना यात्रेच्या अगोदरच्या दिवशीच मारुती कुंभार (वय ७६) यांचे निधन झाले. यामुळे यात्रेत भिल्लाचे सोंग सादर होणार का?, गावची परंपरा अखंडित राहणार का? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला होता.
अशा वेळी शरद कुंभार यांनी सावडणे विधी उरकून भिल्लाचे सोंग हा देखावा सादर केला. वडिलांचे निधन झाले असतानाही गावची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी भिल्लाचे सोंग सादर केले, याचे कौतुक होत आहे.
अनेक वर्षांची परंपरा
हिंगणगाव यात्रेत भिल्लाचे सोंग सादर करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. माझे वडील मारुती कुंभार हे तीस वर्षे हा देखावा सादर करीत होते. गेल्या तेरा वर्षांपासून मी सोंगाचा देखावा सादर करीत आहे. यावर्षी वडिलांनी देखावा सादर करण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण त्यांचे एक दिवस अगोदरच निधन झाले. त्यांची इच्छा पूर्ण करणे आणि परंपरा खंडित होऊ नये, यासाठी दु:ख बाजूला ठेवून देखावा सादर केला.