नागठाणे परिसरात गणेशमूर्तींचे रंगकाम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:21+5:302021-08-20T04:45:21+5:30
नागठाणे : नागठाणे परिसरातील नागरिकांना पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवातील बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. संपूर्ण नागठाणे (ता. सातारा) परिसरात ...

नागठाणे परिसरात गणेशमूर्तींचे रंगकाम युद्धपातळीवर
नागठाणे : नागठाणे परिसरातील नागरिकांना पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवातील बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. संपूर्ण नागठाणे (ता. सातारा) परिसरात सध्या श्री गणेशमूर्तींच्या सजावटीची कामे युद्धपातळीवर सुरू असून, बहुतांशी मूर्ती सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नागठाणे परिसरातील काशीळ, निसराळे, अतीत, नागठाणे, बोरगाव, आदी ग्रामीण भागांत कुंभार गल्लीत गणेशमूर्ती निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभार समाजातील मूर्तिकारांनी अधिक कष्ट घेऊन नेहमीच्या मूर्ती पूर्ण केल्या आहेत. सध्या मूर्ती रंगविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात साच्यामधून मूर्तीचा आकार घेतला जातो. शाडू मातीपासून गणेशमूर्तींना सुबकता आणली जाते. यानंतर मूर्ती कोरड्या केल्या जातात; पण गेले महिनाभर पाऊस असल्याने मूर्ती कोरड्या करण्यास विलंब झाला. अतिवृष्टीच्या काळात मूर्ती तयार करण्याचे काम काहीअंशी ठप्प झाले होते. अनेक ठिकाणी मूर्ती पावसाच्या पाण्यात भिजल्या आहेत. त्या पुन्हा वाळवून रंगकामासाठी बराच वेळ कारागिरांना लागला. एक ते दोन फुटी उंचीच्या मूर्ती ग्रामीण भागात घरोघरी आणल्या जातात. मूर्ती तयार करण्यासाठी कुंभार तीन महिने मग्न असतात. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक तरुण मंडळांच्या मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त नसणार आहेत. या मूर्ती तयार करण्यासाठी कुंभार कलाकारांना या वर्षी खूप मेहनत घ्यावी लागली. सध्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. कुंभार कुटुंबीय मूर्तीचे रंगकाम करीत आहेत. कुंभार गल्लीमध्ये मूर्तीच्या रंगकामाची लगबग सुरू आहे.
(चौकट..)
ग्रामीण भागात शाडूच्या मूर्तींना पसंती..!
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे; त्यामुळे नागठाणे भागातील तरुण मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याचे दृष्टीने यंदाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची मोठी प्रतीक्षा असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वर्षी श्री गणेशमूर्तींच्या किमतीत २० टक्के वाढ झालेली दिसून येत आहे. ग्रामीण भागात शाडूच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी या वर्षीचाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आयोजले आहे.