शेंद्रे-सोनगाव रस्त्यावर तरस जखमी

By Admin | Updated: May 15, 2015 23:33 IST2015-05-15T22:07:34+5:302015-05-15T23:33:48+5:30

अपघाताची शक्यता : उपचारांसाठी पुण्याच्या कात्रज उद्यानात रवानगी

Pain on the Shedre-Sonanga road hurt | शेंद्रे-सोनगाव रस्त्यावर तरस जखमी

शेंद्रे-सोनगाव रस्त्यावर तरस जखमी

सातारा : शेंद्रे ते सोनगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एक तरस जखमी अवस्थेत आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारांसाठी ताब्यात घेतले असून, गोडोली येथील रोपवाटिकेच्या आवारात त्याची देखभाल केल्यानंतर उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि उपचारांसाठी तरसाला कात्रज (पुणे) येथील संजय गांधी उद्यानात रवाना करण्यात आले. शेंद्रे गावाजवळ रस्त्यावरच एक तरस जखमी अवस्थेत असल्याची माहिती मेंढ्यांसह शेतात मुक्कामास असलेल्या एका मेंढपाळाने शेंद्रे गावचे पोलीस पाटील उमेश यशवंत यादव यांना शुक्रवारी भल्या सकाळी दिली. यादव यांनी सातारा वनविभागाला सकाळी सव्वासात वाजता फोनवरून ही माहिती कळविली. साताऱ्याचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे यांनी वनपाल सुनील भोसले, वनरक्षक शंकर आवळे, प्रशांत पडवळ, दीपक गायकवाड यांना तातडीने पिंंजरा घेऊन शेंद्रे येथे पाठविले. तोपर्यंत तरसाभोवती प्रचंड गर्दी झाली होती. तरसाला पाठीमागील बाजूस वाहनाने धडक दिली असावी, असा अंदाज आहे. कमरेखाली त्याचे मागील पाय हालचाल करू शकत नव्हते.
वन कर्मचाऱ्यांनी गर्दी हटवून तरसाला पिंजऱ्यात पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. तरसाला हालचाल करता येत नसल्याने त्याला पिंंजऱ्यात घालणे कठीण जात होते. तीन बाजूंनी उभे राहून वन कर्मचाऱ्यांनी काठ्यांच्या साह्याने तरसाला ढकलत पिंजऱ्यापर्यंत नेले. सुमारे दीड तास यासाठी खटपट सुरू होती. पिंंजऱ्यातून तरसाला साताऱ्यात आणण्यात आले आणि नंतर पुण्याला पाठविण्यात आले. उपचारांनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. (प्रतिनिधी)


जंगलचा ‘सफाई कामगार’
४तरसाला जंगलचा ‘सफाई कामगार’ म्हटले जाते. हा स्वत: क्वचितच शिकार करतो. बिबट्यासारख्या इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलेला भाग हा पळवून खातो. त्यामुळे आपोआपच साफसफाई होते. मांसापेक्षा हाडे तो अधिक चवीने खात असल्याने त्याच्या दाढा अत्यंत तीक्ष्ण असतात. माणसाच्या सावलीलाही तो उभा राहत नाही. परंतु माणसाकडून डिवचले गेल्यास स्वसंरक्षणासाठी हल्ला करण्याची शक्यता असते.


बघ्यांच्या गर्दीमुळे बिथरले
तरसाला पकडण्यापेक्षा अधिक परिश्रम वन कर्मचाऱ्यांना गर्दी हटविण्यासाठी करावे लागले. तरसाचे फोटो काढण्यासाठी असंख्य मोबाइल कॅमेरे उतावीळ झाले होते. अनेकजण अगदी जवळ जाऊन तरसाचा फोटो काढू पाहत होते. अखेर ‘मोबाइल जप्त केला जाईल,’ असा इशारा बघ्यांना देऊन गर्दी हटवावी लागली. आधीच जखमी झालेले तरस या गर्दीमुळे बिथरले होते. दरम्यान, पूर्ण वाढ झालेला हा नर सुमारे अडीच फूट उंचीचा आहे.

Web Title: Pain on the Shedre-Sonanga road hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.