यवतेश्वर घाटात दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:29+5:302021-05-19T04:39:29+5:30
पेट्री : चक्रीवादळ व पावसामुळे सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली. या मार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने दरड ...

यवतेश्वर घाटात दरड कोसळली
पेट्री : चक्रीवादळ व पावसामुळे सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली. या मार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने दरड कोसळल्याने वाहतुकीला कोणताही धोका निर्माण झाला नाही.
सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वळीव पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळ व पावसाचा पश्चिम भागाला जोरदार तडाखा बसला. दरम्यान, मंगळवारी सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातही काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. लहान-मोठ्या स्वरूपात मुरुम, माती, दगडं रस्त्यालगतच्या चरीत व स्त्यावर येऊन कोसळले.
कोसळलेल्या दरडीमुळे वाहतुकीस अडथळा होत नसला, तरी या ठिकाणच्या चरी बुजल्याने पुन्हा पाऊस झाल्यास, वाहणारे पाणी, माती, मुरुम काही प्रमाणात रस्त्यावरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने चरीतून दगड, माती हटवावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून केली जात आहे.
फोटो : १८ सागर चव्हाण
ताउते चक्रीवादळाच्या तडाख्याने सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. (छाया : सागर चव्हाण)