पवनचक्कीच्या आॅईलनं जळाली भातशेती!

By Admin | Updated: August 10, 2015 21:15 IST2015-08-10T21:15:41+5:302015-08-10T21:15:41+5:30

पाटण तालुका : शेतकऱ्यांचे नुकसान; मोरेवाडीच्या शिवारात प्रकार निदर्शनास --लोकमत विशेष

Paddy fields burnt by windmills! | पवनचक्कीच्या आॅईलनं जळाली भातशेती!

पवनचक्कीच्या आॅईलनं जळाली भातशेती!

अरूण पवार- पाटण -तालुक्याच्या मोरणा परिसरात होऊ घातलेल्या पवनचक्की प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या जमिनीतून अतिक्रमण करताना गुंडांचा आधार घेतला. बोगस चेक देऊन बळीराजाची बोळवण केली. एवढेच काय खंडणीचे खोटे गुन्हे लावून शेतकऱ्यांना तुरुंग दाखविले. याहीपुढे जाऊन आता शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणण्याचे रसायन सोडले असून, पवनचक्की यार्डमध्ये उभ्या असलेल्या वाहनातील आॅईलची गळती सुरू झाल्याने परिसरातील भातशेती जळाल्याच्या घटना घडत आहेत. मोरेवाडीच्या शिवारात हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून एका पवनचक्की प्रकल्पाचे वाहने थांबविण्याचे यार्ड मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रोडलगत आहे. याठिकाणी पवनचक्क्यांची पाती आणि इतर साहित्य उतरविले जात आहे. अजूनही तिथे काही वाहने उभी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे सर्वत्र पाण्याचा प्रवाह आहे. पवनचक्की यार्डच्या आसपास भातशेती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच पवनचक्की यार्डामधील उभ्या असलेल्या वाहनातील विषारी रसायनाची गळती सुरू झाली आहे. गळती झालेले रसायन पाण्यात मिसळले आहे. हेच पाणी शेतीला पुरविले जात असल्यामुळे तेलमिश्रित पाण्याने भातशेती करपली आहे, असा संबंधित शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यांच्या आरोपात तथ्य असून, दोघा भावांची शेती जळून गेल्यासारखी
झाली आहे. भाताची रोपे वाळून गेली आहेत. या धोक्याची चर्चा मोरणा परिसरात सुरू असून शेतकरी चिंतेत आहेत.


माझी स्वत:ची भातशेती पवनचक्की कंपनीच्या वाहनातील आॅईल गळतीमुळे जळून गेली आहे. याबाबत पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधीला फोन केला असता ते प्रतिसाद देत नाहीत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? कंपनीने येऊन माझ्या शेतीची पाहणी करावी व मला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करणार आहे.
-दिलीप मोरे, शेतकरी, मोरेवाडी (पेठ शिवापूर)ता. पाटण.

आॅईल गळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
भातशेतीत पवनचक्की वाहनातील गळती झालेले आॅईल शिरल्याने मोरेवाडी (पेठशिवापूर) येथील दिलीप मोरे, आनंदा मोरे, विजय मोरे, हरिबा मोरे, रामचंद्र मोरे, हणमंत मोरे आदी शेतकऱ्यांची भातशेती जळून खाक झाली आहे. याबाबत कंपनीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Paddy fields burnt by windmills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.