ओगलेवाडी : अनेक राजकीय आणि सामाजिक सभा समारंभाचे साक्षीदार असलेल्या आणि तालुक्यातील सर्वांत पहिल्या दिवंगत पी. डी. पाटील स्मृती सदन असे नामकरण झालेल्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हजारमाची ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच विद्या घबाडे आणि उपसरपंच प्रशांत यादव यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायत मालकीच्या वास्तूची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत या इमारतीचे रंगकाम झाल्याने नवी झळाळी प्राप्त झाली आहे. तिरंगा रंगात रंगवलेली इमारत गावाच्या वैभवात भर टाकत आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रथमच खासदार झाल्यावर या ठिकाणी खासदार निधीची रक्कम उपलब्ध करून दिली होती. या निधीतून येथे सभागृह बांधण्यात आले. गावातील मुख्य चौकात हे सभागृह असल्याने गावातील सर्व राजकीय कार्यक्रमाचे येथेच आयोजन होत असते. नंतर पी. डी. पाटील यांच्या निधनानंतर या इमारतीचे नामकरण दिवंगत पी. डी. पाटील स्मृती सदन असे करण्यात आले. पी. डी. पाटील यांचे त्यांच्या पश्चात नाव दिलेली ही पहिली इमारत आहे. ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन या इमारतीचा रंग उडून गेला होता. इमारतीला अवकळा आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या बाबीकडे कोणाचेही लक्ष नव्हते.
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर आणि सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्यावर उपसरपंच प्रशांत यादव यांनी या इमारतीचे रंगकाम करण्याचा निर्णय घेतला. सरपंच विद्या घबाडे व सर्व नूतन सदस्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आणि या पहिल्या पी. डी. पाटील स्मृती सदनाला रंग दिला जाऊ लागला. समोरच्या खांबाला आकर्षक भारतीय राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात सजवण्यात आल्याने आकर्षकता वाढली आहे.
अनेक राजकीय आणि सामाजिक सभा समारंभाचे साक्षीदार असलेले आणि गावच्या मुख्य चौकाची शान असलेल्या या स्मृती सदनाचे काम केल्याने गावकरी आनंदले आहेत. याच पद्धतीने ग्रामपंचायत आणि इतर मालमत्ता यांचे रंगकामही सुरू आहे. त्यालाही काही दिवसांत नवीन झळाळी प्राप्त होणार आहे.