लोणंद येथील सोना अलॉयज देणार ऑक्सिजनरूपी संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:07+5:302021-04-25T04:39:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणंद : महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन ...

लोणंद येथील सोना अलॉयज देणार ऑक्सिजनरूपी संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद : महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लोणंदची सोना अलॉयज या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने पुढाकार घेतला आहे.
कारखान्यात रोज १० ते १५ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून मागितल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. वर्षांनुवर्षे लोखंडासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद येथील सोना अलॉयजने साताऱ्यासह महाराष्ट्राला प्राणवायूची संजीवनी देण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात केली आहे. काही महिने हा उद्योग अडचणीत असल्याने त्याने विजेचा जोडभार कमी केला होता. मात्र, राज्याला ऑक्सिजनची गरज असल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उद्योगांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत 'सोना अलॉयजने त्यांच्या कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त किमान १५ टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी दाखविली. यासाठी ८०० केव्हीएचा भार वाढवून मागितला होता.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून हा विषय समोर येताच राऊत यांनी यास तत्काळ मंजुरी दिली. यामुळे आता दररोज दीड ते दोन हजार सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला नवसंजीवनी देण्याचे काम सोना अलायज कंपनी करणार आहे.
नवीन प्रकल्प सुरू करण्यास लागणारा कालावधी पाहता आहे त्या उद्योगाला संजीवनी दिली तर तातडीने ऑक्सिजन निर्मिती शक्य होईल. या हेतूने सोना अलायजने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून गुरुवारी महावितरणचे साताऱ्याचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड व बारामतीचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ग्राहक हा २२० केव्ही वाहिनीवर असल्याने मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारित होता. या विषयाची तत्काळ दखल घेत ऑक्सिजनची निकड पाहता कंपनीला आठशे केव्हीए इतका जोडभार आहे. त्या स्थितीत मंजूर करून वीज जोडभार जोडून देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
ऑक्सिजन निर्मितीला रविवार, दि. २५ पासून सुरुवात होत आहे.
ऑक्सिजनची गरज पाहता प्रकल्पाची तातडीने चाचणी घेऊन उत्पादन सुरू करत आहे, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रदीप राऊत यांनी दिली.