भर पावसात पेटला ट्रक

By Admin | Updated: July 27, 2014 23:08 IST2014-07-27T22:24:01+5:302014-07-27T23:08:21+5:30

लोणंद-सातारा रस्त्यावरील दुर्घटना : ट्रकमध्ये होता नऊ कोटी रुपयांचा माल

Overcrowded truck | भर पावसात पेटला ट्रक

भर पावसात पेटला ट्रक

लोणंद : फुरसुंगी-पुणे येथून बंगळूरकडे सौंदर्यप्रसाधने आणि वाहन उद्योगाचे स्पेअर पार्ट घेऊन जाणारा ट्रक लोणंद-सातारा रस्त्यावर रविवारी भरदुपारी अचानकपणे पावसातच पेटला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साहित्याचे मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रकमध्ये जवळपास नऊ कोटींचे साहित्य होते.
दरम्यान, लोणंद परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी सतर्कता दाखवत आग विझविली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लोणंद-सातारा रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. यामध्ये मालवाहतूक ट्रक त्याचबरोबर इतर वाहनांचीही समावेश आहे. रविवारी दुपारी याच मार्गावरून व्हीआरएल लॉजिस्टिक कंपनीचा ट्रक (केए २५ बी ११९३) कंपनीचा ट्रक फुरसुंगी-पुणे येथून बंगळूरकडे चालला होता. ट्रकमध्ये सौंदर्यप्रसाधने आणि वाहन उद्योगसाठी लागणारे स्पेअर पार्ट होते. याची किंमत नऊ कोटी रुपये असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. ट्रकचालक राजासाहेब यांनी लोणंद सोडल्यानंतर ट्रकमधून धूर येत असल्याचे एका दुचाकीस्वाराने राजासाहेब यांना सांगितले. राजासाहेब यांनी धूर खरच येत आहे का? याची पाहणी केली. त्यावेळी त्याला धूर येत असल्याचे दिसले. मात्र, जवळपास कोणी दिसत नसल्यामुळे कोणाला मदतीलाही हाक मारता येत नव्हती.
राजासाहेब याने लोणंदनजीक असणाऱ्या निंबोडी फाट्याजवळील एका फर्मसमोर थांबविला आणि ट्रकवरील ताडपत्री काढून टाकली. ताडपत्री काढताच धुमसत असणारी आग भडकली गेली.
भर पावसातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान, ही माहिती आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना कळाल्यामुळे त्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, भडकणारी आग पाहून पुढे कोणी जायला तयार नव्हते. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. जवळपास आग विझविण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे आग वाढतच होती. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता.
याचवेळी लोणंद येथील सीतानंद वॉटर सप्लायर्सचे मालक भिकूलाल शेळके घटनास्थळी टँकर घेऊनच आले. त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रकशेजारी पाण्याचा टँकर नेला आणि आग विझविण्यास सुरुवात केली. यानंतर मदतीसाठी ग्रामस्थ पुढे आले.
ट्रकमध्ये सुमारे ९ कोटी रुपयांची सौंदर्यप्रसाधने आणि वाहन उद्योगासाठी लागणारे साहित्य असल्यामुळे आग बराच वेळ धुमसत राहिली. परिणामी नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.
दुपारी पावणेतीन वाजता लागलेली आग सव्वाचार वाजेपर्यंत धुमसत होती. या घटनेनंतर लोणंद-सातारा रस्त्यावर दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Overcrowded truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.