सुरांच्या साथीने खाकीची तणावावर मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:44+5:302021-05-23T04:39:44+5:30
सातारा : आवड असेल तर सवड मिळते अशी एक म्हण प्रचलित आहे; पण सध्याच्या कोरोनाच्या महामारीत छंद जोपासणे तसे ...

सुरांच्या साथीने खाकीची तणावावर मात !
सातारा : आवड असेल तर सवड मिळते अशी एक म्हण प्रचलित आहे; पण सध्याच्या कोरोनाच्या महामारीत छंद जोपासणे तसे अवघडच. मात्र याला काही पोलीस कर्मचारी अपवाद ठरले आहेत.
सध्याच्या कोरोना महामारीत बारा ते सोळा तासांची ड्यूटी केल्यानंतरही काही पोलीस कर्मचारी आपला छंद जोपासून कामाचा ताण हलका करीत आहेत. छंदातूनच निर्माण झालेली ही कला इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही प्रेरणादायी आहे.
जिल्हा पोलीस दलात असे अनेक कलाकार दडलेले आहेत. त्यांतील कोणी गायनाचा छंद जोपासला आहे; तर कुणी विविध प्रकारची वाद्ये वाजवतात. काहीजण उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत; तर काही लघुपट निर्मितीसारखे अवघड काम करताना दिसतात. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमित व्यायाम छंद जोपासून आपल्या सहकाऱ्यांना सदृढ आरोग्याची प्रेरणा दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. कर्तव्य करीत मनाची प्रसन्नता टिकवण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी स्वयंप्रेरणेने आपले छंद जोपासत आहेत.
लाचलुचपत विभागामध्ये कार्यरत असलेले मारुती आडगळे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनापासून गायनाची आवड निर्माण झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर ही आवड कायम ठेवली आहे. कामाच्या व्यापामध्ये कधीकधी आवड जोपासणे शक्य होत नाही; मात्र ड्यूटीवरून घरी आल्यानंतर थोडा विरंगुळा म्हणून गाणी म्हणत असतो. गायनाची कला मी अद्यापही टिकून ठेवल्यामुळे मला उत्साह कायम वाढतो. कामावर असताना कसलाही ताणतणाव जाणवत नाही.
पोलीस कर्मचारी सूरज नाडे सांगतात,
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याच्या एका गाण्याची निर्मिती केली. युट्यूबवर हे गाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरले आहे. कामातून वेळ काढून गाणे शिकत असून शास्त्रीय संगीताची एक परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. गीतगायनातून मनाला प्रसन्न वाटते तसेच समाजप्रबोधन संदेश देता येतो.
स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले शरद बेबले म्हणाले, गत दहा वर्षांपासून व्यायामाचा छंद जोपासला असून यात कधीही खंड पडू दिला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे जिम बंद असल्याने मी घरीच व्यायाम करतो. नियमित व्यायामाने मन प्रसन्न राहते. कामाचा ताण हलका होतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरीर निरोगी राहते.