२४० झाडे तोडणाऱ्यांवर ‘ब्रह्मा’स्त्र

By Admin | Updated: July 16, 2014 01:22 IST2014-07-16T01:21:39+5:302014-07-16T01:22:08+5:30

महाबळेश्वरात गुन्हा : उद्योगपतीविरुद्ध कारवाईची पहिलीच वेळ

Over 240 trees breakers 'Brahma' | २४० झाडे तोडणाऱ्यांवर ‘ब्रह्मा’स्त्र

२४० झाडे तोडणाऱ्यांवर ‘ब्रह्मा’स्त्र

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरालगत असणाऱ्या तारांकित हॉटेलच्या मालकाविरुद्ध वृक्षतोडप्रकरणी पालिकेने गुन्हा नोंद केला आहे. ‘ब्रह्मा कॉर्प हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स असे या हॉटेलचे नाव असून, पालिकेकडून उद्योगपतीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेने वनअधिकारी कल्याण बाजीराव हिरवे (वय ४०) यांना यासंदर्भात फिर्याद दिली आहे. याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : महाबळेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व्हे नंबर २११, २१२ मधील दहा हेक्टर व ५८.२ आर क्षेत्रात ब्रह्मा कॉर्प हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लि. या कंपनीचे मालक रामकुमार बी आगरवाल, रा. पुणे यांनी आणि त्यांचे व्यवस्थापक अक्का मंदार रेगे (रा. औंध-पुणे) यांनी संगनमत करून त्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत २४५ झाडे तोडल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या परिसरात दुमजली बंगले, गटारे, मैला टाक्या, पाण्याचे हौद, बगीचा बनविण्यासाठी या झाडांचा ‘अडथळा’ झाला होता. यामध्ये जांभळाची १२५ झाडे, तर गेळा ३०, हिरडा १५, पिसा १३, मेडसिंग ८, अंजन ४७, भोमा २, ऐन १, नरक्या तीन व चिमट १ अशा झाडांचा समावेश आहे. यातील काही औषधी वनस्पती आहेत. झाडे व झाडाच्या फांद्या तोडून २ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान संबंधितांनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महाबळेश्वरमधील आजपर्यंतचे सर्वांत मोठे हॉटेल उभारण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचे समोर आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक वृक्षप्रेमींनी केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. काशिद, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Over 240 trees breakers 'Brahma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.