ढगाळ वातावरणामुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:26+5:302021-01-09T04:33:26+5:30

रामापूर : गत दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली ...

Outbreaks appear to be exacerbated during cloudy weather | ढगाळ वातावरणामुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव

रामापूर : गत दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून हवेत गारवा असल्याने रब्बी पिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. शाळू, हरभरा, गहू या पिकांवर चिकटा रोग पडण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत. आणखी काही दिवस वातावरण असेच राहिले, तर पिके रोगांना बळी पडतील. त्यामुळे शेतकरी औषध फवारणी करण्याच्या विचारात आहेत.

ढेबेवाडी फाटा परिसरात सुशोभीकरण गरजेचे

मलकापूर : येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत ढेबेवाडी फाट्यावर उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण केले आहे. मात्र, कोरोना काळात सुशोभीकरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने तेथील झाडे गायब झाली आहेत. अज्ञातांनी काही रोपे उपटून टाकली आहेत, तर कुंड्यांचीही मोडतोड केली आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणअंतर्गत करण्यात आलेल्या या सुशोभीकरणामुळे ढेबेवाडी फाट्यावरील सौंदर्य खुलले होते. सध्या येथील काही झाडे गायब असल्याने त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. पालिकेने पुन्हा एकदा त्याकडे लक्ष देऊन रोपांची लागवड करण्याची गरज आहे. सध्या हा परिसर बकाल झाल्याचे दिसून येत आहे.

उरुल घाटात कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी

मल्हारपेठ : उंब्रज ते मल्हारपेठ रस्त्यावरील उरुल घाटात दुर्गंधी वाढली आहे. मृत जनावरे व कचरा टाकण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना अक्षरश: नाक धरून घाटाचा परिसर चालावा लागत आहे. या घाटात कायमच सुविधांची वानवा असते. त्यात नेहमीच समस्यांची भर पडत असून घाटातील एका वळणावर मृत जनावरे टाकली जात असल्याने त्याठिकाणी मोकाट श्वानांचा वावरही वाढला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर हे श्वान हल्ला करीत आहेत. त्यामुळे घाटात जाण्यास परिसरातील ग्रामस्थ धजावत नाहीत. याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कऱ्हाडला वाढीव भागात फवारणीची मागणी

कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. शहरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधक फवारणीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने कार्वे नाक्यापासून पूर्व व पश्चिम भागातील सर्व भागांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. याबाबतचे निवेदन नागरिकांनी पालिकेला दिले आहे. फवारणीचे वेळापत्रक आखून पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

पाटण तालुका अद्याप ‘आऊट ऑफ कव्हरेज’

पाटण : पाटण विभागात मोबाईल नॉट रिचेबल दाखवत आहेत. विविध कंपन्यांच्या सिमकार्डला रेंज येत नसल्याने पर्यटक हताश झाले आहेत. अमर्याद संभाषण व इंटरनेट सेवा-सुविधा देणाऱ्या विविध कंपन्यांच्या सिमकार्डचा वापर सध्या जास्त प्रमाणात वाढला आहे. यातील काही कंपनीची सेवा पाटण विभागात सुरूही झालेली नसताना त्या कंपनीचे कार्ड लोकांनी खरेदीही केले आहेत. सध्या काही कंपनीच्या सिमकार्डला रेंज आहे. मात्र, नवीन सुरू झालेल्या नवीन कंपनीच्या सिमकार्डला रेंज नसल्याने संपर्क करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

पाटण शहरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज

रामापूर : पाटण शहरात गत काही दिवस सुरू असलेले घरफोडीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी याबाबत ठोस उपाययोजना करण्याची आणि चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. शहरात चोरट्यांनी बंद घरे आणि बंद दुकाने लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. गत काही दिवस शहरात बंद दुकाने, बंद घरे चोरट्यांंनी फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याची गरज आहे. त्यासाठी रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.