सातार्‍यात ठिकठिकाणी उद्रेक

By Admin | Updated: June 2, 2014 01:19 IST2014-06-02T00:59:06+5:302014-06-02T01:19:39+5:30

पोलिसांचे नियंत्रण :जमाव हिंसक ; वाईत लाठी हल्ला; कडकडीत बंद

Outbreak at Satara | सातार्‍यात ठिकठिकाणी उद्रेक

सातार्‍यात ठिकठिकाणी उद्रेक

सातारा : सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारी आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर ‘पोस्ट’ केल्याचे कळताच जिल्ह्यात उद्रेक पसरला. सातारा, कºहाड, फलटण, कोरेगाव व वाईसह अनेक ठिकाणी ‘बंद’चे आवाहन करण्यात आले. ठिकठिकाणी मोर्चे, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळीसारखे प्रकार घडल्याने पोलिसांची दमछाक झाली. दरम्यान, जिल्ह्यातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाखाली आहे. सातारा शहरात विविध संघटनांनी आज, रविवारी बंद पुकारला होता. मुख्य बाजारपेठा बंद राहिल्या. अनेक ठिकाणी एसटी बसेसची मोडतोड करण्यात आली. यात एका प्रवाशासह दोन चालक किरकोळ जखमी झाले. घटनेचे सर्र्वांत उग्र पडसाद कोरेगाव शहर आणि परिसरात उमटले. काल, शनिवारी रात्रीपासूनच हल्ले, जाळपोळ अशा घटना कोरेगावात घडल्या. धार्मिक स्थळे आणि वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहने पेटविण्याबरोबरच नदीपात्रात फेकून देण्याच्या घटना घडल्या. फलटणमध्ये कार्यकर्त्यांच्या जमावाने निषेध फेरी काढून ‘बंद’चे आवाहन केले. साखरवाडीत प्रार्थनास्थळावर हल्ला करून एकास मारहाण करण्यात आली. सुरवडी, निंभोरे, वडजल, तरडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. कºहाड शहर आणि तालुक्यातही बंद पाळण्यात आला. पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली. पाटण शहरातही बंद पाळण्यात आला. त्यामुळे या दुर्गम भागांतील प्रवाशांचे हाल झाले. वाईमध्ये संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. किसन वीर चौकातील दोन दुकानांवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले. दरम्यान, भुईजमध्ये जमावाने एका प्रार्थनास्थळावर दगडफेक करून तेथे झेंडा लावण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. परंतु पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि जमावाला समजावून सांगून शांत केले. माण, खटाव, लोणंद, शिरवळ, आदर्की आणि जिल्ह्यातील इतरही अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला. (प्रतिनिधी) २५ एसटी बसेस फोडल्या जिल्ह्यात एकंदर २५ एसटी बसेस फोडण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. दरवेळीप्रमाणे याहीवेळी एसटीला ‘टार्गेट’ करण्यात आले. दगडफेकीत एसटीच्या आर्थिक नुकसानीबरोबरच काही जणांना जखमा झाल्या आहेत. कोरेगावजवळ तर प्रवाशांनी भरलेल्या एसटीवर दगडफेक झाली. सातारा आगारात ही बस आली, तेव्हा बसमध्ये दगडांचा खच पडल्याचे दिसून आले. या दगडफेकीत बसमधील एक लहान मूल थोडक्यात बचावले.

Web Title: Outbreak at Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.