..अन्यथा गरजेपुरते पिकवावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:11+5:302021-09-17T04:46:11+5:30
शेतमालाला दर नसल्याने शेतकरी संतप्त लोकमत न्यूज नेटवर्क औंध : ‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गरज असून, काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे ...

..अन्यथा गरजेपुरते पिकवावे लागेल
शेतमालाला दर नसल्याने शेतकरी संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : ‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गरज असून, काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे भांडवलही निघत नाही. कोणतेही पीक केले तरी दराच्या बाबतीत नेहमीच ओरड आहे. त्यामुळे शासनाने योग्य हमीभाव शेतमालाला द्यावा, अन्यथा येथून पुढे आम्हांला गरजेपुरते पिकवावे लागेल,’ असा इशारा औंधचे प्रगतशील शेतकरी गणेश देशमुख यांनी दिला आहे.
औंध येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अनिल माने, वैभव हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘सध्या आले पिकाला दर नाही, ऊसाची वेळेवर बिले मिळत नाहीत. मेथी, शापू, कांदे याला दर नाही. पीकपद्धती बदलून शेती केली तरी काही फायदा होईना. त्यामुळे आज दर मिळेल, उद्या दर मिळेल या आशेवर शेतकरी जगत आहे. मात्र, युवा शेतकरी म्हातारा झाला तरी काही दर मिळेना. खतांच्या दरात वाढ, औषध, बी-बियाणे महाग होत आहेत. मात्र, शेतमालाला दर वाढत नाही. त्यामुळे येथून पुढे गरजेपुरता अन्नधान्य पिकवावे लागेल, असा निर्णय आम्हा सर्वांना घ्यावा लागेल.’