चारा छावणी भ्रष्टाचारप्रकरणी बिजवडी सोसायटीच्या अध्यक्षासह सचिवावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST2021-03-08T04:37:06+5:302021-03-08T04:37:06+5:30
दहिवडी : माण-खटाव तालुक्यातील चारा छावणीतील भ्रष्टाचारप्रकरणी बिजवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन यशवंत शिणगार आणि तत्कालीन ...

चारा छावणी भ्रष्टाचारप्रकरणी बिजवडी सोसायटीच्या अध्यक्षासह सचिवावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
दहिवडी : माण-खटाव तालुक्यातील चारा छावणीतील भ्रष्टाचारप्रकरणी बिजवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन यशवंत शिणगार आणि तत्कालीन सचिव विकास भोसले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दहिवडी न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.
संजय भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माण, खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांतील अपहारप्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अनेक महिने पाठपुरावा करून हे प्रकरण दुर्लक्षित होत होते. यामुळेच दहिवडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तहसीलदार सर्जेराव माने, मंडलाधिकारी नंदकिशोर महाडिक, तलाठी युवराज एकनाथ बोराटे, ग्रामसेवक नितीन बबन सोनवलकर, कृषी सहायक शिवाजी पांडुरंग गावडे, बिजवडी विकास सोसायटीचे चेअरमन यशवंत नामदेव शिणगारे, सचिव विकास दिनकर भोसले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे सरकारी नोकरदार असून या प्रकरणाच्या तपासामध्ये यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध दिसून आल्यास त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेऊन गुन्हे दाखल करण्यात यावेत; तसेच बिजवडी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन यशवंत शिणगारे तसेच सचिव विकास भोसले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे आदेश न्यायालयाने दहिवडी पोलिसांना दिले. या फिर्यादीचे काम वडूज येथील ॲड. नितीन गोडसे व दहिवडीचे ॲड. मीनेश पाटील यांनी पाहिले.
कोट :
चारा छावणीप्रकरणी बिजवडी सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष शिणगारे तसेच सचिव भोसले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मिळाले आहेत. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- राजकुमार भुजबळ,
सहायक पोलीस निरीक्षक, दहिवडी