ओढ्यावरील बांधकामांना स्थगितीचे आदेश
By Admin | Updated: April 15, 2015 00:18 IST2015-04-15T00:18:15+5:302015-04-15T00:18:15+5:30
विजय शिवतारे : ओढ्याशेजारील बांधकामांची मोजमापे घेऊन ‘ओढा पड’ जमिनी ताब्यात घेण्याच्या सूचना

ओढ्यावरील बांधकामांना स्थगितीचे आदेश
सातारा : शहरात ऐतिहासिक ओढ्यांवर सुरु असलेल्या बांधकामांना नोटिसा देऊन बांधकामांना स्थगिती देण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी दिले. ओढ्यालगत असणाऱ्या मिळकतींची मोजमापे घेऊन ‘ओढा पड’ जमिनी ताब्यात घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.
साताऱ्यातील ऐतिहासिक सुळाचा ओढा मुजवून त्यावर बांधकाम केले गेल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासना नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी आपचे जिल्हा संयोजक सागर भोगावकर यांनी शिष्टमंडळासोबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ओढ्यावरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली. दरम्यान, यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले. सातारा शहरात अजिंक्यतारा किल्ल्यावरुन वाहत येणारे अनेक ऐतिहासिक ओढे आहेत. मात्र, या ओढ्यांचे प्रवाह बदलून बांधकामे करण्यात आली आहेत. काहींनी तर हे ओढे मुजवून त्यावर बांधकामे केली आहेत. या ओढ्यांच्या शासकीय जमिनी अनेकांनी लाटल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. ओढे मुजवून त्यावर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईच होत नसल्याने अशी बांधकामे फोफावत चालली आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील ओढ्यालगतच्या मिळकतींची मोजणी करुन ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत, त्यांना ती काढून टाकण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने कराव्यात. तसेच शासनाच्या मालकीची ओढा पड जमीन ताब्यात घेण्यात याव्यात, असे आदेश पालकमंत्र्यांनी काढले आहेत. (प्रतिनिधी)