राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:11+5:302021-08-26T04:42:11+5:30

असे असू शकते संभाव्य चित्र दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता ...

Opposition's game in the capital ... why should the kings get along! | राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

असे असू शकते संभाव्य चित्र

दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल अजूनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मनात असू शकते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. दुसरीकडे खा. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश त्यांच्या काही शिलेदारांच्या पचनी पडलेला नाही. असे शिलेदार वेगळी वाट शोधण्याचा धोकाही आहे. खा. उदयनराजेंमुळे कोरेगाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदेंना विधानसभेला मोठा हादरा बसला. त्याचा वचपा म्हणून शशिकांत शिंदे यांनीदेखील पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे खासदारांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी यंदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मात्र, खा. उदयनराजे भोसले हे फासा पलटण्यात तितकेच माहीर आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.

(चौकट)

असे होते पक्षीय बलाबल

एकूण प्रभाग २०

एकूण नगरसेवक : ४०

सातारा विकास आघाडी : २२

नगर विकास आघाडी : १२

भारतीय जनता पार्टी : ६

(चौकट)

हद्दवाढीमुळे असा असेल बदल

द्विसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द

यंदा एक वार्ड एक नगरसेवक

एकूण वार्ड ४८

एकूण नगरसेवक ४८

हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या ६१ हजार

(चौकट)

राजकीय समीकरण बदलले...

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या आघाडीने सत्ता स्थापन केली, तर भाजपच्या सहा नगरसेवकांनीदेखील प्रथमच पालिकेचा उंबरठा ओलांडला. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी पालिकेची निवडणूक एकत्र येऊन व पक्षाच्या चिन्हावर लढविली जाईल, अशी शक्यता धूसर आहे. येत्या दोन-तीन महिन्यात बरीच राजकीय समीकरणे बदलणार असून, दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेली पत्रकबाजी याचीच सुरुवात असल्याची चर्चा आहे.

(चौकट)

वचननामा पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न

सत्ताधारी सातारा विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत जनतेला दिलेला वचननामा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, घरकुल योजना, रस्ते विकास, पाणी योजनांचे बळकटीकरण, दिवाबत्ती यापैकी अनेक योजनांची कामे मार्गी लावली, तर काही योजना प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांना हा ‘वचननामा’ कितपत लाभदायी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Opposition's game in the capital ... why should the kings get along!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.